नालेसफाईसाठी महिलांना जुंपल्याने श्रमजीवीची महापालिकेत उपायुक्तांविरुद्ध निदर्शने
By धीरज परब | Published: December 17, 2023 04:23 PM2023-12-17T16:23:03+5:302023-12-17T16:23:14+5:30
पालिका उपायुक्त रवी पवार यांनी नाले सफाईच्या कामाला ठेक्यावरील महिलांना जुंपले असता महिलांनी नालेसफाईच्या कामास नकार दिला .
मीरारोड - पालिकेने दैनंदिन नालेसफाईच्या कामास महिलांना जुंपले म्हणून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग सदस्य यांच्या दौऱ्या वेळी पालिका उपायुक्त यांच्यावर कारवाईची मागणी करत श्रमजीवी संघटनेने निदर्शने केली. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगचे सदस्य सुभाष पारधी यांनी शनिवारी १६ डिसेम्बर रोजी मीरा भाईंदर महापालिका मुख्यालयात येऊन अनुसूचित जाती जमातीतील कामगारांच्या समस्या, योजना आदींचा आढावा घेतला. माजी खासदार संजीव नाईक, अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त संजय शिंदे व कल्पिता पिंपळे, शहर अभियंता दिपक खांबीत, पारधी यांचे सचिव नवीन रोहिला, विभागप्रमुख तसेच व विविध संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महानगरपालिका आस्थापनेत अनुसूचित जाती जमाती कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या आरक्षण, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना अंतर्गत महानगरपालिकेने काँक्रिट रस्ता, गटार बांधणे, नाल्यावरील स्लॅब टाकणे, रंगमंच बांधकाम इत्यादी कामे करण्यात येणार असल्या बद्दल माहिती सादर केली. यावेळी पारधी यांनी पालिकेने केलेल्या कामाचा सविस्तर अहवाल येत्या ३० दिवसात देण्याची सूचना केली. तर श्रमजीवी कामगार संघटनेच्या वतीने कार्याध्यक्ष सुलतान पटेल यांनी पारधी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
डॉ. बाबासाहेब श्रमसाफल्य घरकुल योजने अंतर्गत २१२ पात्र सफाई कामगार पैकी १५० कामगार हे अनुसूचित जाती जमातीतील असून ७ वर्षांपासून सदनिका मिळालेल्या नाहीत. पंतप्रधान आवास योजना, बीएसयुपी, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत १५ टक्के घरे सफाई कामगारांना देण्याचे शासन आदेश असून देखील दिली गेली नाहीत. पालिकेच्या अर्थसंकल्पापैकी १ टक्का रकमेतून सफाई कामगारांना घरे बांधून मिळावीत. वारसा हक्क व अनुकंपाचा लाभ मिळावा म्हणून लाड-पांगे समितीच्या शिफारशी पालिका लागू करत नाही आदी मुद्दे पटेल यांनी पारधी यांच्या कडे मांडत सफाई कामगारांना त्यांचा न्यायिक हक्क देण्याची मागणी केली.
दरम्यान पालिका उपायुक्त रवी पवार यांनी नाले सफाईच्या कामाला ठेक्यावरील महिलांना जुंपले असता महिलांनी नालेसफाईच्या कामास नकार दिला . तर नेहमीचे काम करून सुद्धा महिलांचा दिवस न भरता खाडा मारण्यात आल्याने पवार यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबित करा अशी मागणी श्रमजीवी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल यांनी पारधी यांच्या कडे केली. यावेळी संघटनेचे ठाणे उपाध्यक्ष मंगेश पाटील , मीरा भाईंदर अध्यक्ष मंगेश मोरे, सरचिटणीस इरफान शेख, उपाध्यक्ष जयश्री पाटील व महेश पाटील यांनी लेखी तक्रार पारधी यांच्या कडे दिली. श्रमजीवी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी यावेळी पालिकेत पवार यांच्या विरुद्ध घोषणाबाजी करत निषेध केला . पवार यांच्यावर कारवाई झाली नाही तर संस्थापक अध्यक्ष विवेकभाऊ पंडित यांच्या मार्गदर्शना नुसार सोमवार पासून आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. पालिकेत उपायुक्त पवार बसतातच कसे? हे बघू असा इशारा पटेल यांनी दिला.