मीरा भाईंदरच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे पुढील आठवड्यात सुरु होणार - प्रताप सरनाईक
By धीरज परब | Published: October 25, 2023 06:40 PM2023-10-25T18:40:14+5:302023-10-25T18:40:51+5:30
मीरा भाईंदर शहरातील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची कामे पुढील आठवड्यात सुरु होणार आहेत.
मीरारोड - मीरा भाईंदर शहरातील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची कामे पुढील आठवड्यात सुरु होणार आहेत. १८०० कोटींच्या ह्या कामासाठी एमएमआरडीए १४०० कोटी तर महापालिका ४०० कोटी खर्च करणार असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर आपल्या मागणीनुसार मीरा भाईंदरच्या विकासासाठी विविध प्रकारे सुमारे ३ हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ह्या कामांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त संजय काटकर यांच्या सोबत बुधवारी महापालिका मुख्यालयात बैठक घेण्यात आल्याचे आ. सरनाईक म्हणाले.
बैठकीत शासनाने मंजूर केलेल्या निधींची कामे वेळेत पूर्ण करावीत, विकासकामात दिरंगाई होऊ नये. काही कामात तांत्रिक बाबी पूर्ण करायच्या आहेत. विविध परवानगी आणणे व वेळेत कामे पूर्ण करून पुढील एका वर्षात विकास कामांचे लोकार्पण करणे आदी विषयांवर चर्चा झाली. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, विविध खात्यांचे अधिकारी यांच्याशीही चर्चा करून आवश्यक परवानग्या मार्गी लावल्या आहेत असे या. सरनाईक म्हणाले.
नागरिकांना चांगले दर्जेदार, खड्डेमुक्त व टिकाऊ रस्ते मिळावेत यासाठी १८०० कोटी रुपयांचा खर्च सिमेंट काँक्रीट रस्ते व उडडाणपूल होणार आहे .या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून मंजुरीही आणली होती . एमएमआरडीए १४०० कोटी खर्च करून रस्ते व पूल बांधणार आहे . तर महापालिका ४०० कोटी खर्च करून सिमेंट रस्ते करणार आहे. या कामासाठी ठेकेदारांना कार्यादेश दिले असून पुढील आठवड्यात हे काम सुरु होईल.
शहरातील ८० टक्के रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे होणार आहेत. मार्च महिन्यापर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा मानस महापालिका आयुक्तांनी व्यक्त केला आहे. हे रस्ते किमान २५ वर्षे टिकतील असा विश्वास आहे. काँक्रीट रस्त्यांची कामे सुरु करताना सूर्या पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याचे वितरण करण्यासाठी शहरात अंतर्गत जल वाहिनी टाकण्याचे कामही आधी केले जाणार आहे. जेणेकरून पुन्हा खोदकाम होणार नाही. योग्य नियोजन करून सिमेंट रस्त्यांची कामे सुरु होतील असे आ. सरनाईक यांनी सांगितले.