कोविडच्या बंदिशाळेतून लवकरच जगाची सुटका व्हावी; शांततामय क्रांतीचा आग्रह धरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 10:58 PM2020-12-31T22:58:33+5:302020-12-31T22:58:49+5:30

कोविडच्या या बंदिशाळेतून नवीन वर्षात जगाची सुटका व्हावी, हीच अपेक्षा असल्याचे मत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.

The world should soon be freed from the captivity of covid | कोविडच्या बंदिशाळेतून लवकरच जगाची सुटका व्हावी; शांततामय क्रांतीचा आग्रह धरावा

कोविडच्या बंदिशाळेतून लवकरच जगाची सुटका व्हावी; शांततामय क्रांतीचा आग्रह धरावा

Next

आशीष राणे

वसई : जग आपल्या गतीने, आपल्या पद्धतीने आणि किंबहुना आपल्या मस्तीने चालले असताना अचानक कोविड-१९ महामारीने जगाला खिंडीमध्ये पकडले, हे चिंताजनक आहे. आज जगाची अवस्था बंदिशाळेसारखी झालेली आहे. कोविडच्या या बंदिशाळेतून नवीन वर्षात जगाची सुटका व्हावी, हीच अपेक्षा असल्याचे मत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.

फादर दिब्रिटो म्हणाले की, माझ्या प्रिय देशवासीय मित्रांनो, एका अर्थाने गेली तीनचार दशके आपण या साथीची जणू तयारी करीत होतो की काय, असेच वाटायला लागले आहे. कोविड-१९ चे संकट विनाशकारी आहे. ज्या पद्धतीने जल, जंगल आणि जमीन यांचे शोषण होत आहेत, पर्यावरणाचा विनाश होत आहे, त्या अर्थाने कुठल्या तरी महान संकटाची आपण सर्वजण तयारी करीत होतो, हे सांगण्यासाठी ग्रेटा थुलबर्ग नावाची एक चिमुरडी मुलगी जगाच्या व्यासपीठावर आली.  आज प्रत्येक राष्ट्र हे दुसऱ्या राष्ट्रापेक्षा शक्तिशाली किंबहुना मोठे होण्याचा प्रयत्न करत आहे. मिलिटरी, लष्कर वाढवले जातेय, तर युद्धनौका व युद्धासाठी लागणारी विमाने याची खरेदी होत आहे.

कशासाठी हे सर्व? जणू माणसाला माणूस आपला शत्रू वाटू लागला आहे. समोरची व्यक्ती माझा मित्र नाही तर माझे भक्ष्य आहे, शिकार आहे, त्यादृष्टीने राष्ट्रे एकमेकांकडे पाहत आहेत आणि म्हणूनच आपल्याला हे सर्व होत असताना चिंतन करणे आवश्यक आहे. 
कोविडमध्ये गरिबांचे शोषण झाले. या महामारीच्या वेळी सगळ्यात जास्त शोषण झालेला वर्ग म्हणजे गरीबवर्ग, ज्यांच्याकडे काहीही नाही आहे. स्थलांतरितांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला. या महामारीमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आपण स्थलांतरितांचा प्रश्न पाहिला, अगदी मुक्या जनावरांप्रमाणे ते रस्त्यावरून चालत होते. त्यांना कुणी वाली उरलेला नव्हता. शासनदेखील तोकडे पडले व आपली सर्व व्यवस्था पांगळी झाली, असे ते म्हणाले. 

Web Title: The world should soon be freed from the captivity of covid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.