डहाणूमध्ये पारंपरिक तारपा नृत्याच्या आविष्कारात आदिवासी दिन साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 04:56 PM2018-08-09T16:56:57+5:302018-08-09T17:04:16+5:30
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्यसाधत तालुक्यातील गाव-पाड्यात पारंपरिक वेशभूषा केलेल्या आदिवासी बांधवांनी तारपा या पारंपरिक नृत्याविष्काराचे सादरीकरण करून हा दिन साजरा केला.
अनिरुद्ध पाटील
डहाणू/बोर्डी : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्यसाधत तालुक्यातील गाव-पाड्यात पारंपरिक वेशभूषा केलेल्या आदिवासी बांधवांनी तारपा या पारंपरिक नृत्याविष्काराचे सादरीकरण करून हा दिन साजरा केला. आदिवासी दिनाकरिता तालुक्यातील विविध गावांनी मिळून उत्सव समितीची स्थापना केली आहे. त्यानुसार गुरुवार सकाळपासून रॅलीचे आयोजन करून, सामूहिक ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
डहाणू सागरनाक येथील बिरसा मुंडा तारपा चौकात सकाळी साडेसातच्या सुमारास मशाल पेटवून पूजन करण्यात आले. तारपकरीला (तारपावादक) केल्यानंतर गंजाड गावापर्यंत रॅली काढण्यात आली. त्यामध्ये लहान मुले, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. गावागावाहून आलेल्या कलापथकांनी आदिवासी संस्कृतीतील नृत्याचे सादरीकरण केले. दुपारी बारा वाजेननंतर जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांच्या सामूहिक कार्यक्रमांसाठी तालुक्यातील जनसमुदाय पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला.