जागतिक महिला दिन विशेष। महिला सक्षमीकरणाच्या नुसत्याच वल्गना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 11:06 PM2020-03-07T23:06:42+5:302020-03-07T23:07:15+5:30
प्रत्यक्षात मात्र सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन धूळ खात
विरार : राज्यभरात ८ मार्च जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. यानिमित्त एकीकडे महिलांच्या कर्तृत्वाचा सत्कार होत असताना, दुसरीकडे मात्र त्यांची कुंचबणा होत असल्याचे चित्र दिसत आहे. कारण विरार पूर्वेच्या खानिवडे भागात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन धूळ खात पडल्या आहेत. यामधील एकही पॅड विकले गेले नाही हे दुर्दैव आहे. विशेष म्हणजे सरकारकडून व स्थानिक नेते मंडळींकडून महिला सक्षमीकरणाच्या बाता छेडल्या जातात. मात्र प्रत्यक्षात दुर्गम भाग व आदिवासी पाड्यातील परिस्थिती अत्यंत विपरीत आहे.
पूवेर्तील खानिवडे व सकवार हा आदिवासी दुर्गम भाग आहे. या भागातील आदिवासी महिला मासिक पाळीदरम्यान कपडा वापरतात. यामुळे त्यांना आजारासंबंधित विविध समस्यांना सामोरे जावे लागते. दुर्गम भागातील परिस्थिती बदलण्यासाठी राज्य सरकारतर्फे या दोन्ही गावांच्या ग्रामपंचायतीला सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन देण्यात आली. त्यानुसार या ग्रामपंचायतींनी दोन्ही मशिनी जिल्हा परिषद शाळेत लावल्या आहेत. मात्र या वेंडिंग मशिनीमधून एकही सॅनिटरी पॅड विकत घेतले नाही आहे, हे अत्यंत धक्कादायक आहे. या महिलांना पॅड वापरण्याची सवय लागली असता, इतक्या किमतीत नक्कीच त्यांनी पॅड खरेदी केला असता.