रब्बी हंगामही हातून गेल्याने बळीराजा चिंतीत; सोसायट्यांकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 12:24 AM2019-01-03T00:24:34+5:302019-01-03T00:24:43+5:30
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका भाताचे कोठार म्हणून पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. येथील जमीन पाणी धरून ठेवणारी असल्याने इथे भाताच्या जोरावर शेतकरी आपला उदरनिर्वाह करतो.
वाडा : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका भाताचे कोठार म्हणून पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. येथील जमीन पाणी धरून ठेवणारी असल्याने इथे भाताच्या जोरावर शेतकरी आपला उदरनिर्वाह करतो. यावर्षी मात्र ऐन हंगामात पाऊस निघून गेल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला गेला. भाताबरोबर रब्बी हंगाम शेतकऱ्याच्या हातून निघून गेल्याने तो संकटात सापडला असून शेतीसाठी सोसायट्यांचे घेतलेले कर्ज फेडायचे कसे या चिंतेने तो चिंतीत झाला आहे.
भाता खालोखाल सुमारे १००० हेक्टर क्षेत्रात कडधान्याचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये हरभरा, वाल , तूर, चवळी, तीळ, धणे, मोहरी, उडीद, राई आदी पिके दरवर्षी घेतली जातात. यावर्षी मात्र पाऊस गेल्याने कडधान्याचा हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे येथील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
तालुक्यातील शेती पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. शिवाय येथे बारमाही वाहणाºया पाच नद्या आहेत. मात्र सिंचनाच्या कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा नसल्याने येथील शेतकºयाला आधुनिक शेती करता येत नाही. आजही तो पारंपरिक पद्धतीनेच शेती करतो. त्यामुळे यावर्षी पाऊस गेल्याने भात शेती मोठ्या प्रमाणात करपून गेली आहे. त्यामुळे येथील शेतकºयांनी उभी पिके स्वत:च्या हाताने पेटवून दिलीत. तरी आणेवारीसाठी प्लॉट निवडताना उत्पन्न चांगले आहे . अशा प्लॉटची निवड केली. मात्र नियमाप्रमाणे हळवे, निमगरवे, गरवे अशा भाताच्या जाती घेणे बंधनकारक असतांना तसे न करता एकाच प्रकारचे उत्तम पिक येणारे क्षेत्र विमा कंपनीच्या फायद्यासाठी घेऊन व शेतकºयांची दिशाभूल करून फसवी आणेवारी जाहीर केली गेली आहे.