गुन्हा दाखल न करताच रेतीचे ट्रक सोडल्याने संताप ; केली दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 03:16 AM2018-02-11T03:16:31+5:302018-02-11T03:16:37+5:30
रेतीची चोरटी वाहतूक करणारे तीन ट्रक ताब्यात घेतल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल न करताच दंडात्मक कारवाई करून ट्रक सोडून देण्यात आल्याने महसूल खात्याचे अधिकारी रेती चोरांना अभय देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
- शशी करपे
वसई : रेतीची चोरटी वाहतूक करणारे तीन ट्रक ताब्यात घेतल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल न करताच दंडात्मक कारवाई करून ट्रक सोडून देण्यात आल्याने महसूल खात्याचे अधिकारी रेती चोरांना अभय देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
रेतीची चोरटी वाहतूक करणारे तीन ट्रक नायब तहसिलदार हरिश्चंद्र जाधव यांनी पकडले होते. पकडलेले ट्रक मनवेलपाडा पोलीस चौकीत नेण्यात आले होते. दोन दिवस ट्रक पोलीस चौकीजवळ ठेवण्यात आले होते. मात्र, संबंधितांवर दोन दिवसात गुन्हा दाखल करण्याची कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र, दंडात्मक कारवाई करून ट्रक सोडून देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
याप्रकरणी नायब तहसिलदार जाधव यांनी ट्रक पकडण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. दंडात्मक रक्कम भरल्याने कारवाई करण्याचा प्रश्नच उरत नसल्याचे त्यांनी सांगितले. पुढील कारवाई तहसिलदार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तहसिलदार किरण सुरवसे यांच्याशी संपर्क साधला असता दंडात्मक कारवाई केल्यावर दंडाची रक्कम भरल्यावर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले.
वसई विरार परिसरात सध्या चोरटे रेती उत्खनन आणि चोरटी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. पोलीस, महसूल विभागाचा वरदहस्त असल्याने सुट्टीच्या दिवशी आणि रात्रभर मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर चोरटी रेती वाहतूक केली जाते. त्यात पकडलेल्या ट्र्कवर फौजदारी कारवाई न करता फक्त दंडात्मक कारवाई करून
सोडून दिले जात आहे. त्यामुळे चोरटी रेती वाहतूकीला महसूल खात्याकडूनच पाठिंबा दिला जात असल्याचा
आरोप केला जातो. त्यातच रेतीवाले ब-याचदा महसुल अधिकाºयांवर
हल्ले करण्याचे प्रकारही सुरु असल्याने कर्मचारी हतबल होतत असे चित्र आहे.