श्रीक्षेत्र निर्मळ येथील यात्रेला सोमवारपासून सुरूवात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 01:34 AM2018-12-02T01:34:02+5:302018-12-02T01:34:05+5:30

श्रीक्षेत्र निर्मळ यात्रेला कार्तिक एकदाशीला (दि.3 डिसेंबर) सुरूवात होणार आहे.

The yatra at Shrikhetra Nirmal started from Monday ... | श्रीक्षेत्र निर्मळ येथील यात्रेला सोमवारपासून सुरूवात...

श्रीक्षेत्र निर्मळ येथील यात्रेला सोमवारपासून सुरूवात...

googlenewsNext

वसई : तालुक्यातील श्रीक्षेत्र निर्मळ यात्रेला कार्तिक एकदाशीला (दि.3 डिसेंबर) सुरूवात होणार आहे. निर्मळ येथे श्रीमद जगदगुरू शंकराचार्यांचे समाधीस्थान आहे. पालघर जिल्ह्यातून हजारो भाविक या समाधीचे दर्शन व यात्रेचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. ही यात्रा पंधरा दिवस असते.
निर्मळ येथील विमल तलाव हे पवित्र तिर्थ असल्याचे भावीक मानतात. देव-देवतांनी या विमल तलावात स्नान केले असल्याची आख्यायीका आहे. ख्रिस्त जन्माच्या पाच हजार वर्ष पूर्वीपासूनचा पौराणिक इतिहास या पुरातन तीर्थक्षेत्राला लाभलेला आहे.
वसई तालुका व जिल्ह्याबाहेरूनही यात्रेकरू मोठ्या प्रमाणात समाधी दर्शनास येणार असल्याने मंदिराच्या विश्वस्त मंडळाने नियोजन केले आहे. पालिकेच्या वतीने रस्त्याची डागडुजी, यात्रेकरूंसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तात्पुरती फिरती शौचालये, औषध फवारणी, वैद्यकीय सुवीधा केली गेली आहे. मंदिर व्यवस्थापनाने मंदिराची रंगरंगोटी, रोषणाई, परिसराची स्वच्छता केली आहे. भाविकांना बसण्यासाठी मंदिराच्या हॉलमध्ये विश्रामगृहाची सोय असणार आहे. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यादृष्टीने नियोजन केले जात असल्याचे मंदिराचे सचिव व नगरसेवक पंकज चोरघे यांनी सांगितले. सुळेश्वर येथे आठ फिरती शौचालये तसेच मंदिरासमोर पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.भाविकांना
आपत्कालीन स्थीतीत मदतीसाठी अग्निशमन दलाची गाडी तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. एकादशीला सकाळी वाघोली मराठी शाळेपासून शंकराचार्य मंदिरापर्यंत विद्यार्थ्यांच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी शंकराचार्यांच्या प्रतिमेची वाजत -गाजत पालखी निघणार आहे. मुख्य मंदिरापासून पालखी विमल तलावाला वळसा घालून दरवर्षी येत असते. विमल तलावाच्या काठी असलेल्या सुळेश्वरमंदिराला प्रदक्षीणा घालून पालखी निर्मळ नाक्यावरून पहाटे मुख्य रस्त्यावरून मंदिरात येणार आहे. दरवर्षाप्रमाणे यंदाही यात्रेच्या कालावधीत सुरक्षेसाठी वसई पोलिस जादा बंदोबस्त मागवणार असून वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून ट्रॅफिक पोलिस निर्मळ नाका व भुईगाव फाटा येथे पुरेसा बंदोबस्त ठेवणार आहेत. वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, अशी सूचना मंदिर विश्वस्त मंडळाचे सल्लागार बबन नाईक यांनी केली आहे.
>सुकेळी खास आकर्षण
निर्मळ नाक्यापासून ते भुईगाव फाट्यापर्यंत सध्या विविध प्रकारची खेळण्यांची ,मिठाई तसेच सूकामेव्यांची दूकाने लागण्यास सुरूवात झाली आहे .विविध खेळणी रस्त्याच्या दुतर्फा दाखल झाली आहेत. या यात्रेत वसईची सुप्रसिद्घ सुकेळी, खजूर, पेढे, साखर पेठा, मिठाईची तसेच शिंगाडे व शेंगदाण्यांची दुकाने उभी राहीली आहेत.
>ऐतिहासिक महत्त्व...
भगवान श्री परशुरामांनी विमलासुराचा वध करून श्री विमल-निर्मळ सरोवर तीर्थाची निर्मिती केली आहे. या तीर्थाचे पावित्र्य काशी-प्रयागासारखा आहे. या तीर्थाच्या परिधीत भरणाऱ्या यात्रेत तीर्थस्नान, पिंडदान, तर्पण, भजन, कीर्तन, पालखी सोहळा, देवदर्शन वगैरे पुण्यकार्यासाठी दुरून यात्रेकरू अनेक वर्षांपासून येतात.

Web Title: The yatra at Shrikhetra Nirmal started from Monday ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.