यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 12:41 AM2019-10-21T00:41:00+5:302019-10-21T06:41:39+5:30
डहाणूतील शाळेचा उपक्रम; विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
डहाणू/बोर्डी : पारनाका येथील के. एल. पोंदा हायस्कूल आणि राष्ट्रीय हरित सेना यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी फटाकेमुक्त दिवाळी जनजागृती अभियान राबविण्यात आले.
दिवाळी म्हटली की फटाके आलेच. पण, गेल्या काही वर्षांमध्ये आवाजाच्या फटाक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी आता केवळ शोभेचे फटाके वाजवण्याचा नवीन ट्रेंड येतो आहे. यातूनच हे फटाकेमुक्त दिवाळी अभियान समोर आले आहे. फटाके वाजवल्याने होणारे दुष्परिणाम सहा. शिक्षक बाळासाहेब चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी याबाबतची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. आपण फटाके फोडणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, फटाके फोडल्याने होणारे दुष्परिणाम सांगताना हवेचे प्रदूषण आणि आवाजाचे प्रदूषण टाळण्याचा निर्धार करण्यात आला. या आवाजामुळे होणाऱ्या त्रासापासून रुग्ण, लहान मुले आणि पशूपक्षी यांना मुक्ती मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
फटाक्यासाठी पैसे खर्च न करता तेच पैसे वापरून अवांतर पुस्तके खरेदी करून ती स्वत: वाचून घरातील इतर सदस्यांना, नातेवाईकांना आणि मित्रांना देऊन वाचन चळवळ वाढवण्यासाठी योगदान देण्याचेही यावेळी ठरविण्यात आले. यावेळी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक रविंद्र बागेसर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.