घोलवड, बोर्डीतील लिचीच्या उत्पादनात यंदा वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 12:30 AM2019-05-27T00:30:10+5:302019-05-27T00:30:15+5:30

यंदा लिची फळांचे पीक जोमाने आल्याने बागायतदार सुखावला आहे.

This year, the increase in the production of Bolli, Litchi | घोलवड, बोर्डीतील लिचीच्या उत्पादनात यंदा वाढ

घोलवड, बोर्डीतील लिचीच्या उत्पादनात यंदा वाढ

googlenewsNext

- अनिरुद्ध पाटील
बोर्डी : यंदा लिची फळांचे पीक जोमाने आल्याने बागायतदार सुखावला आहे. गतवर्षी खराब हवामानामुळे हे उत्पादन केवळ १० टक्केच आले होते. त्यामुळे फळांचे भाव गगनाला भिडले होते. शिवाय स्थानिकांप्रमाणेच पर्यटकांनाही आस्वाद घेता आला नव्हता, यावेळी ती कसर भरून निघतांना दिसत आहे. दरम्यान प्रतिनग सहा रुपये इतका चढा दर झाल्याने श्रीमंतांचे फळ ही ओळख त्याने निर्माण केली आहे.
गतवर्षी डिसेंबर महिन्यात ओखी वादळामुळे पाऊस होऊन वातावरणात गारवा निर्माण झाल्याने केवळ १० टक्केच उत्पादन आले होते. मात्र यंदा हिवाळ्यात दहा अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाची नोंद होऊन सलग ८ ते १० दिवस थंडी स्थिरावल्याने बहार चांगला येऊन उत्पादनात वाढ झाली आहे. वटवाघळे फळं फस्त करीत असल्याने त्यांचा उपद्व्याप सहन करावा लागत आहे. त्यापासून संरक्षणाकरिता संपूर्ण झाडांना नायलॉन नेटद्वारे आच्छादित करावी लागते, शिवाय हि बाब खर्चिक असून अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. काही ठिकाणी रात्री वीजेचे दिवे पेटवले जातात. मात्र बोर्डीतील आघाडीचे लिची उत्पादक सतीश म्हात्रे यांनी फळांच्या प्रत्येक घडाला प्लास्टिक पिशव्या बांधण्याचा प्रयोग काही वर्षांपूर्वी करून पाहिला त्याला यश आल्याचे ते म्हणाले. शिवाय किडरोगापासून त्याचे संरक्षण होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
उत्तर भारतानंतर महाराष्ट्रात केवळ या जिल्हयातील डहाणू तालुक्यात तिचे व्यापारीतत्वावर उत्पादन घेतले जाते. तेथे एकूण उत्पादना पैकी निम्म्या फळांना किडीचा प्रादुर्भाव झालेला दिसतो. येथे मात्र खत, पाणी आणि फवारणीच्या योग्य व्यवस्थापन तंत्रामुळे हे प्रमाण खूपच कमी करता आले आहे. परंतु अन्य फळपिकांपेक्षा दरवर्षी खात्रीपूर्वक उत्पादन येत नसल्याने लागवडीच्या क्षेत्रात वाढ न झाल्याचे म्हात्रे म्हणाले. त्यामुळेच तालुक्यात केवळ २० ते २५ लिची बागायतदार आहेत. २०१७ साली १५० फळांसाठी ८०० रूपयांचा दर होता. तर गतवर्षी प्रमाणे या हंगामातही ९०० रुपयांचा विक्रमी दर असल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मात्र बाजारातील मक्तेदारी टिकून असल्याने फळांचा आस्वाद घेण्याकरिता ग्राहकांच्या उड्या पडतात. सध्या सुरू असलेल्या उन्हाळी पर्यटन हंगामात त्याचा प्रत्यय येत आहे. प्रतावारीनुसार दीडशेनगास अनुक्र मे ९००, ७०० आणि ६०० रु पयांचा दर आहे. डहाणू बोर्डी रस्त्यावर अनेक स्टॉल उभे राहिलेले दिसतात.
>लिचीविषयीची माहिती
लिचीचे शास्त्रीय नाव लीची चायनेन्सीस असून त्याचे मूळस्थान चीन मध्ये आहे. सुमारे सतराव्या शतकात त्याचे भारतात आगमन झाले. पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील घोलवड आणि बोर्डी ही गावं या करीता प्रसिद्ध आहेत. हवामान आणि जमिनीच्या प्रकारानुसार रोपांमध्ये निरनिराळ्या गुणधर्माच्या ८ ते १० जाती आहेत. घोलवड लीची म्हणून प्रसिद्ध असलेल्या जाती मध्ये अर्ली व लेट असे दोन प्रकार आहेत. बियांपासून अभिवृद्धी झालेल्या झाडाला १५ वर्षानी तर गुटी कलमापासून अभिवृद्धी झालेले झाड ७ ते ८ वर्षानी फळं देते. पूर्ण वाढ झालेल्या एका झाडाचे सरासरी उत्पादन ११५ किलो पर्यंत येते. फल धारणा झाल्यानंतर ५० ते ५५ दिवसात फळ काढणीस तयार होते. नारंगी रंग जाऊन गुलाबी, लालसर रंग आल्यास फळे तयार झाली असे समजतात. शिवाय फळाच्या सालीचा पृष्टभाग खडबडीत न राहता सपाट होतो. तसेच दाबून पाहील्यास फळ नरम लागते. एका घडात २० ते २५ फळं असून सुमारे २५ सेमी लांबीचा घड पानांसह काढावा लागतो. मे मध्य ते जूनचा पहिला आठवडा काढणीचा हंगाम आहे. बांबूच्या करांड्यात किंवा खोक्यात करंज झाडाचा हिरव्या पाल्यात पॅकिंग केली जाते. त्यामुळे उत्तम रंग येतो.
>लिचीचे पोषण मूल्य : लालसर आकर्षक रंग, मोहक सुगंध आणि चवीमुळे ही फळं लोकप्रीय आहेत. या फळात ८७ टक्के पाणी, साखरेचे प्रमाण १२ टक्के, प्रथिने ०.७ टक्के, स्निग्धांश ०.५ टक्के व खनिजाचे प्रमाण ०.७ टक्के असते. लीची मध्ये ६५ कॅलरी असून जीवनसत्व क ६४ मी.ग्रॅम असते.
रात्री वटवाघळे ही फळे फस्त करीत असल्याने संपूर्ण झाडाला झाल्याने शाकारण्यात येते. दोन-तीन वर्षांपासून घडाला प्लॅस्टीक पिशव्या बांधण्याचा प्रयोग केला. तो यशस्वी झाला असून किडीचा प्रादुर्भाव टाळता आला आहे. - सतीश म्हात्रे, लिची उत्पादक,
लिची निर्यात करावी लागत नाही, दरवर्षी पर्यटन हंगामात येथे पर्यटक दाखल होऊन खरेदी करतात. हे या पिकाचे वैशिष्ट्य आहे. याद्वारे स्थानिकांच्या हाताला रोजगार मिळतो.
- जतीन काकरिया, लिची उत्पादक

Web Title: This year, the increase in the production of Bolli, Litchi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.