तिळाला यंदा स्वस्ताईचा गोडवा !
By admin | Published: January 13, 2017 05:58 AM2017-01-13T05:58:15+5:302017-01-13T05:58:15+5:30
शनिवारच्या संक्रांतीसाठी लागणाऱ्या तिळाचा दर किलोमागे ३० ते ५० रुपयांनी उतरल्याने
हितेन नाईक /पालघर
शनिवारच्या संक्रांतीसाठी लागणाऱ्या तिळाचा दर किलोमागे ३० ते ५० रुपयांनी उतरल्याने तसेच साखर, गुळाच्या दरात ही किरकोळ वाढ झाल्याने यावर्षीची मकरसंक्रात सगळ्यांसाठी गोडगोड ठरणार आहे.
ह्या सणानिमीत्त अबालवृद्ध ‘तिळगुळ घ्या गोडगोड बोला’ असे म्हणत एकमेकांची गळाभेट घेत असतात. मात्र, प्रत्येक सणासुदीला किचन कॅबिनेट सांभाळणाऱ्या गृहिणींची बजेट राखतांना तारांबळ उडत असते. परंतु यंदा तसे होणार नाही.
गतवर्षी तिळाचा प्रति किलो दर १२० ते १४० असा होता तर साखर ३६ रु पये, गुळ ५०-५५ प्रति किलो होता. ह्यावर्षी मात्र तीळ प्रतिकिलो ९० ते ११० असा खाली उतरल्याने गृहिणींमध्ये समाधानाचे वातावरण आहे. साखर व गूळामध्ये ८ ते १० रुपयांचे वाढ प्रति किलो झाली आहे. त्यामुळे महिला
वर्ग आतापासूनच तीळ, गुळ, साखर,तूप आदी खरेदीत मग्न झाला आहे.
पालघर जिल्ह्यात शेतकरी,बागायतदार वर्ग मोठ्या प्रमाणात राहत असून केळवे, माहीम, शिरगाव येथील वाडवळ, भंडारी, आगरी आदी समाजात संक्र ातीच्या दिवशी आवर्जून बनविल्या जाणाऱ्या ‘उकड हंडी’चा स्वाद घेण्यासाठी इतर समाजातील मंडळी त्यांच्या आमंत्रणाची वाट पहात असतात. कंदमुळ हे एक पौष्टिक खाद्य समजले जात असल्याने कोनफळ, वांगी, शेवग्याच्या शेंगा, वाल- पापडी, रताळे, कांद्याची पात, बटाटे, वालगुळे, किसलेला नारळ आदी एकत्र करून त्याला मसाला लावून मुरवून एका मातीच्या मडक्यात भरले जाते. त्याला केळीच्या पानात गुंडाळून एका मोकळ्या जागेत ठेवून त्याच्या चोहो बाजूने आग पेटविली जाते.
तास दिड तासाने मडक्यातील पदार्थ शिजल्या नंतर मित्र, नातेवाईक ह्यांच्या सोबतीने या उकड हंडीचा फडशा पाडला जातो.
चवीला अत्यंत पोषक समजल्या जाणाऱ्या ह्या शाकाहारी पदार्थात आता चिकन, बोंबील, करंदी
आदी मांसाहारी पदार्थ घालून उकड हंडी बनवली जात आहे. ह्यावेळी माडाच्या बियांपासून उगवलेले तरले ही वाफवून विक्रीसाठी ठेवण्यात येतात.ह्याला मोठी मागणी असते. (प्रतिनिधी)
आगळी परंपरा अन् रिवाज
सकाळी लवकर उठून पाणी गरम करून त्यात तीळ घालून त्याने आंघोळ केली जाते. नंतर दुधात तांदळाची खीर शिजवल्यानंतर देवाला नैवद्य दाखवला जातो. तर तिळ, तूप, गूळ ह्याचे मिश्रण एकत्र करून केलेले लाडू घरातील सर्व सदस्य एकत्र बसून खातात.
आपला देश हा शेतीप्रधान असल्याने आपल्या शेतात नवीन आलेल्या धान्याचे स्वागत,पूजनही केले जाते.सकाळी सूर्य पूजेसाठी जेथे स्वच्छ ऊन पडते ती जागा स्त्रिया झाडून शेणाने सारवून घेतात.
त्याच्यावर तांदळाच्या पीठाने सूर्याची प्रतिमा काढून त्याच्या दोन बाजूस संध्या आणि छाया या सूर्याच्या दोन भार्या ची चित्रे रेखाटली जातात व त्यांचे पूजन केले जाते गाई,बैलांना आंघोळ घालून त्यांचीही पूजा केली जाते.
संकष्टी आली आडवी
संक्र ातीच्या दुसऱ्या दिवशी नवं दाम्पत्यास, मित्रमंडळीस तिखट जेवणासाठी आमंत्रण असते.
ह्या दिवशी रविवार आल्याने कोंबडी आणि मटनाच्या मेजवानीचा सर्वांनी आखलेला बेत संकष्टी आल्याने रद्द करावा लागणार आहे.त्यामुळे हा बेत बुधवार पर्यंत पुढे ढकलावा लागणार आहे.