येस बँक खातेधारकांमध्ये गोंधळाचे वातावरण, खातेधारकांची बँकेच्या शाखांवर सकाळपासूनच गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 12:49 AM2020-03-07T00:49:48+5:302020-03-07T00:49:52+5:30
खाजगी क्षेत्रातील येस बँकेवर निर्बंध घातल्याने विरार पश्चिमेतील बँकेच्या शाखेवर शुक्रवार सकाळपासून खातेधारकांची गर्दी झाली होती. बँकेचे विविध व्यवहार ठप्प झाल्याने खातेधारकांना अनेक अडचणी आल्या.
विरार : रिझर्व्ह बँकेने गुरुवारी खाजगी क्षेत्रातील येस बँकेवर निर्बंध घातल्याने विरार पश्चिमेतील बँकेच्या शाखेवर शुक्रवार सकाळपासून खातेधारकांची गर्दी झाली होती. बँकेचे विविध व्यवहार ठप्प झाल्याने खातेधारकांना अनेक अडचणी आल्या.
येस बँकेच्या खातेदारांना महिन्याला केवळ ५० हजार रुपयेच खात्यातून काढता येणार आहेत. हे निर्बंध तत्काळ लागू होत असल्याचे केंद्र सरकारने जाहीर करताच येस बँकेच्या खातेदारांचा गोंधळ उडाला. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून पश्चिमेच्या येस बँकेच्या विरार शाखेवर आणि एटीएमवर खातेधारकांनी धाव घेतली. बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र वाढत्या गर्दीमुळे अवघ्या काही तासातच एटीएममधली सर्व रक्कम संपली. आणि त्यांनतर आलेल्या ग्राहकांची चांगलीच पंचाईत झाली. ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम काढण्याची मुभा असल्याने सुरुवातीला काही रक्कम मिळाली होती. मात्र त्यानंतर ग्राहकांना टोकन देऊन दुसऱ्या दिवशी बँकेतून पैसे घेऊन जाण्याचे बँक कर्मचाºयाकडून सांगण्यात आले. दरम्यान, काही खातेदारांनी मोबाइल आणि इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातूनही पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला, मात्र या सेवा देखील डाऊन झाल्या होत्या. येस बँकेवर अचानक आलेल्या या निर्बंधांमुळे ग्राहकांचे अतोनात हाल झाले आहेत.
>खातेधारकांना मनस्ताप : अनेकांना आपल्या महत्त्वपूर्ण कामांसाठी ठेवलेले पैसे काढता आले नाहीत. काहींना रुग्णालयात दाखल नातेवाईकांसाठी तर काहींना लग्नासाठी पैसे हवे होते. मात्र ते काढता आले नाहीत. यामुळे खातेधारकांना मोठा मनस्ताप सोसावा लागला. सद्यस्थितीत बँकेचे सर्व व्यवहार ठप्प असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
>बोईसरमध्येही खातेधारकांची गर्दी
बोईसर : आरबीआयने येस बँकेच्या व्यवहारास स्थगिती दिल्याने असंख्य खातेधारकांची एकच धावपळ होऊन त्यांनी बोईसरच्या बँकेसमोर शुक्रवारी एकच गर्दी केली होती. बोईसर शाखेत छोटे-मोठे व्यापारी व कारखानदार आणि बांधकाम क्षेत्रातील काम करणाºया व्यावसायिकांचे तसेच अनेक खातेधारकांचे या बँकेत खाते असल्याने मोठे आर्थिक संकट कोसळून त्यांचे व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे. कामगार व स्थानिक मजूर आपला पगार घेऊन उत्साहाने होळीचा सण साजरा करण्यासाठी घरी जाण्याची तयारीत असतानाच येस बँकेवरील बंदीमुळे त्यांचे पगार करण्यास कठीण झाले आहे. ही बंदी शिथिल करून बँकेचे व्यवहार करण्यास तूर्तास परवानगी द्यावी, तसेच सरकारने हस्तक्षेप करून खातेधारक, व्यावसायिकांची झालेली कोंडी दूर करावी, असे मत बांधकाम व्यावसायिक मनोज चुरी यांनी व्यक्त केले.