क्रिकेट खेळणारे तरुण पोलिसांच्या भीतीने चक्क पळाले समुद्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:35 AM2020-07-25T00:35:16+5:302020-07-25T00:35:28+5:30
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
नालासोपारा : पोलिसांच्या भीतीने आरोपींची पळापळ होते आणि आसरा भेटेल त्या ठिकाणी लपतात, याचाच प्रत्यय विरारच्या अर्नाळा समुद्रावर आला आहे. शुक्रवारी सकाळी अर्नाळा येथे बंदीच्या नियमांचे उल्लंघन करून क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांवर पोलीस कारवाई करण्यासाठी गेले, मात्र हे तरुण चक्क समुद्रात पळाले. या पळापळीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विरारजवळील अर्नाळा गाव हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. या गावात १४८ रुग्ण आढळले असून ४ जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे हे संपूर्ण गाव प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे आणि सर्व व्यवहारांना बंदी घातली आहे. तरीही शुक्रवारी सकाळी समुद्रकिनाºयावर काही तरुण बंदी आदेशाचे उल्लंघन करून क्रिकेट खेळत होते.
पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यावर पोलिसांची एक टीम कारवाई करण्यासाठी गेली. पोलीस आल्याचे पाहताच क्रिकेट खेळणारे तरुण घाबरले आणि सर्वांनी समुद्रात धूम ठोकली. बहुतांश तरुण हे मच्छीमारांची मुले असल्याने पोहण्यात तरबेज आहेत. त्यामुळे त्यांनी पोहून समुद्रातील बोटी गाठल्या. मुलांची पळापळ झाल्याचा हा संपूर्ण व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
क्रिकेट खेळणाºया सर्व तरुणांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे. त्या सर्वांना नोटीस देऊन सोडण्यात आले असून त्यांना वसई न्यायालयात हजर राहण्याची तारीख देण्यात आलेली आहे.
- महेश शेट्ये, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अर्नाळा सागरी पोलीस ठाणे