युवा शेतकऱ्याचा अननस लागवडीचा प्रयोग; पथदर्शी उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 11:20 PM2021-01-01T23:20:24+5:302021-01-01T23:20:43+5:30
अनिरुद्ध पाटील बोर्डी : उत्तर कोकणात अननस पिकासाठी पोषक जमीन व हवामान आहे. मात्र, पहिल्यांदाच डहाणू तालुक्यात या पिकाची ...
अनिरुद्ध पाटील
बोर्डी : उत्तर कोकणात अननस पिकासाठी पोषक जमीन व हवामान आहे. मात्र, पहिल्यांदाच डहाणू तालुक्यात या पिकाची प्रायोगिक तत्त्वावर लागवड करण्यात आली असून, उत्पादनाला प्रारंभ झाला आहे. दरम्यान, पर्यटन आणि वाइन निर्मितीला शासनाने चालना देण्याचे धोरण जाहीर केल्याने, आगामी काळात या पिकाचे क्षेत्र वाढण्याचा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
डहाणू तालुका कृषी विभागातर्फे पारंपरिक आणि नव्या शेतपिकांना चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात, तर आधुनिक शेतीचे तंत्र आणि पीक पद्धतीचा प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याला प्रोत्साहित केले जाते. दरम्यान, सरावली मानफोड येथे नोशीरवान पोलाड या तिशीतील तरुणाने अननस लागवड केली आहे. हा युवक मुंबईत पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन डहाणूत आला आणि बावीसाव्या वर्षांपासून कुटुंबाच्या पारंपरिक चिकू बागेत फळपीक शेतीकडे वळला.
दोन वर्षांपूर्वी बंगलोर येथून विल्यम या अननसाचे वाण १२ रुपये नगाप्रमाणे १० हजार सकर्स आणले. सरी वरंब्यावर ४ बाय २ फूट अंतरावर त्याची लागवड केली. खताच्या योग्य मात्रेसह उन्हाळ्यात ७ दिवस, तर हिवाळ्यात १० दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या देण्यात आल्या. १८ ते २० महिन्यांत उत्पादन सुरू झाल्याचे पोलाड यांनी सांगितले. या पिकावर कीडरोगाचा प्रादुर्भाव होत नसल्याने दर्जेदार उत्पादन सुरू असून, स्थानिक बाजारात ७० रुपये प्रतिकिलो मिळतात. अन्य फळे मुंबई बाजारात निर्यात केली जातात.