प्रेयसीची हत्या करणारा तरुण अटकेत
By admin | Published: August 19, 2016 02:00 AM2016-08-19T02:00:16+5:302016-08-19T02:00:16+5:30
गोखीवरे येथील विद्याविकासिनी शाळेच्या आवारात सापडेलल्या तरूणीच्या हत्येचे गूढ उकलले असून वालीव पोलिसांनी दिल्ली येथून या तरूणीच्या प्रियकराला अटक केली आहे.
वसई : गोखीवरे येथील विद्याविकासिनी शाळेच्या आवारात सापडेलल्या तरूणीच्या हत्येचे गूढ उकलले असून वालीव पोलिसांनी दिल्ली येथून या तरूणीच्या प्रियकराला अटक केली आहे. आपल्या प्रेयसीचे दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याने संतापलेल्या प्रियकराने तिची हत्या करून दिल्लीत पळ काढला होता.
वसई पूर्वेच्या फादरवाडी येथे विद्या विकासिनी शाळेच्या मागील आवारातील मैदानात ३ जुलै रोजी एका तरूणीचा नग्नावस्थेत मृतदेह आढळून आला होता. गळा चिरून तिची हत्या केली होती. पालघर स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणात तपास करून मुलीची ओळख पटवली होती. हा मृतदेह वसईच्या बावशेतपाडा येथे राहणाऱ्या अंकिता टिकडे (१७) या मुलीचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. २६ जूनपासून अंकिता बेपत्ता होती. या घटनेनंतर अंकिताचा प्रियकर मनिष यादव (२२) हा फरार होता.
वालीव पोलिसांनी मनिषच्या शोधासाठी जंगजंग पछाडले होते. तरीही त्याचा शोध लागला नव्हता. अशातच पोलिसांना मनिष वापरत असेलल्या एका मोबाईलचा आयएएमईआय क्रमांक सापडला. मनिषने त्याचा मोबाईल आपल्या मित्राला दिला होता. मित्राने तो मोबाईल भावाला दिला होता. त्यावरून पोलिसांनी चौकशी केली तेव्हा मनिष दिल्लीत असल्याचे समजले. वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक दिल्लीच्या कॅनॉट प्लेस येथे रवाना झाले. तेथील कल्पना हॉटेलध्ये सापळा लावून मनिषला अटक केली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने मनिषच्या मुसक्या आवळल्या. (प्रतिनिधी)
मनिष आणि अंकिता यांचे दोन वर्षांपासून प्रेसंबंध होते. परंतु मनीषचा अंकितावर संशय होता. अंकिताचे मनीषच्या मित्रासवेत प्रेसंबंध सुरू असल्याचे त्याला समजल्याने तो संतापला होता. मनिषने २६ जून रोजी अंकिताला शाळेमागे भेटायला बोलावले. तेथे गळा चिरून हत्या केली.
त्यानंतर तिच्मा मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी तिच्या अंगावरील सगळे कपडे काढले आणि माटुंग्याला मित्राकडे गेला. त्याच्या मदतीने मनिषने दिल्ली गाठले आणि हॉटेलध्ये काम करून राहू लागल्याची माहिती विभागीय पोलीस उपअधिक्षक अनिल आकडे यांनी दिली.