उपचारांअभावी आईसमोर तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराच्या झटक्याने रस्त्यातच कोसळला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 02:26 AM2020-07-13T02:26:44+5:302020-07-13T06:35:43+5:30
सफाळे येथे राहणाऱ्या रवी कसबे (३०) याच्या छातीत गुरुवारी पहाटे चार वाजता अचानक दुखू लागले. उपचारांसाठी त्याने अनेक डॉक्टरांचे दरवाजे ठोठावले; मात्र कोणीच दाद दिली नाही.
पालघर/सफाळे : सफाळे येथील ३० वर्षांच्या तरुणाला उपचार न मिळाल्याने त्याचा रस्त्यातच तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने आईसमोरच तडफडून मृत्यू झाल्याची घटना उघड झाली आहे. या तरुणाच्या मृत्यूने पालघर जिल्ह्यातील आरोग्यसेवेवर भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे केले असून अद्ययावत जिल्हा रुग्णालयाची गरज अधोरेखित झाली आहे.
सफाळे येथे राहणाऱ्या रवी कसबे (३०) याच्या छातीत गुरुवारी पहाटे चार वाजता अचानक दुखू लागले. उपचारांसाठी त्याने अनेक डॉक्टरांचे दरवाजे ठोठावले; मात्र कोणीच दाद दिली नाही. सकाळी छातीतील कळा वाढून अस्वस्थ वाटू लागल्याने तो पुन्हा आपली आई आणि अन्य नातेवाइकांसोबत डॉक्टरकडे जात होता. चालताना रवी कसबे सफाळे रेल्वे स्थानकाशेजारच्या वल्लभबाग गल्लीत खाली कोसळला. कोसळलेल्या मुलाचे डोके आपल्या मांडीवर घेऊ न त्याची छाती चोळत त्याला वाचवण्याचा प्रयत्न आई करत होती. मात्र, तिचे प्रयत्न अपुरे पडले. डोळ्यांदेखत मुलाला तडफडताना पाहून ती धाय मोकलून रडत होती. बाजूच्याच इमारतीत राहणाºया आसिफा शेख व त्यांच्या कुटुंबीयांची नजर तिच्याकडे गेली. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर काही माणसे जमा झाली. मात्र, कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने मदतीचे हात पुढे येत नव्हते. शेवटी १०८ क्रमांकावर दूरध्वनी करून रुग्णवाहिका आल्यानंतर चालक सचिन भोईर व मिकेश शेट्टी यांनी त्याला उचलून गाडीत ठेवले. पालघर येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
जिल्हा रुग्णालयाची गरज
पालघर जिल्ह्यात तीन ग्रामीण रु ग्णालये, नऊ उपजिल्हा रुग्णालये, ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ३१२ आरोग्य उपकेंद्रे अशी आरोग्य यंत्रणा आहे. मात्र, तरीही जिल्ह्यातून चांगल्या उपचारासाठी गुजरात, सिल्वासा येथे जाणारी हजारो पावले आजही थांबलेली नाहीत.
जिल्हा मुख्यालयाच्या अंगणात जिल्हाधिकारी कार्यालयासह डझनभर अद्ययावत व प्रशस्त इमारती दिमाखदारपणे उभ्या राहत आहेत. मात्र, गरिबांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारी जिल्हा रुग्णालये व प्रशिक्षण केंद्रे उभारणीसाठी आवश्यक जमीन मिळवण्यात येथील लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत.
आता नव्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वाढीव जमिनीसाठी मागणी करावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
वावर-वांगणीनंतरचे दुर्दैव : वावर-वांगणीत झालेल्या बालमृत्यूंनंतर आधी जव्हारला तेव्हाच्या ठाणे जिल्ह्याची विभागीय कार्यालये आली. पुढे जिल्हा विभाजन झाले. पालघर हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात आला. तो करताना पुरेशा सोयी-सुविधांचे आश्वासन देण्यात आले. ते किती फोल ठरले ते या घटनेतून दिसून आले. आरोग्य यंत्रणा सलाइनवर असल्याचे स्पष्ट झाले. या जिल्ह्याकडे पाहण्याचा प्रशासकीय यंत्रणेचा दृष्टिकोन दिसून आला.