प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 05:43 AM2020-10-05T05:43:45+5:302020-10-05T05:43:59+5:30
तक्रार देऊनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे मुलीने आपले जीवन संपवल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला
नालासोपारा : लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शरीरसंबंध ठेवले, मात्र नंतर प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने येथील एका १९ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी तक्रार देऊनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे मुलीने आपले जीवन संपवल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
आरोपी सुनील माने (२८) याने नालासोपाऱ्यात राहणाºया तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला, मात्र नंतर त्याने लग्नास नकार दिला. याविरोधात तरुणीने तुळिंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, परंतु पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नाही. उलट, यामध्ये त्या तरुणीचीच चूक असल्याचे पोलिसांनी तिला सांगितल्यामुळे ती नैराश्यात गेली आणि तिने आपले जीवन संपवले, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरकर यांनी तरुणीच्या आईशीही अपमानजनक वर्तन केल्याचा आरोप होत असून नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. मात्र, डीसीपी विजयकांत सागर यांनी केलेल्या विनंतीनंतर मृतदेह ताब्यात घेऊन शनिवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. नालासोपारा येथील अन्सारी नगरात राहणारा आरोपी सुनील माने याला अटक करण्यात आली आहे. तिच्या घरात दोन सुसाईड नोट सापडल्या असून त्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. तरुणीची आई पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार दाखल करायला गेली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरकर यांनी तिला अपमानजनक प्रश्न विचारल्याचा आरोप तरुणीच्या आईने केला आहे. तरुणीच्या आईने डीसीपी विजयकांत सागर यांच्याकडेही तक्रार केली असून डीवायएसपी अश्विनी पाटील या सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गिरकर यांची चौकशी करीत आहेत.