युवकांनी उमेदवारांची योग्यता पाहून मतदान करावे
By admin | Published: January 26, 2017 02:46 AM2017-01-26T02:46:21+5:302017-01-26T02:46:21+5:30
आज आपल्या देशात सुदृढ, सशक्त लोकशाही ही युवाशक्ती मुळे बनली असली तरी आजही धर्म, भाषा, वंशाच्या आधारे निवडणुकीत मतदान
पालघर : आज आपल्या देशात सुदृढ, सशक्त लोकशाही ही युवाशक्ती मुळे बनली असली तरी आजही धर्म, भाषा, वंशाच्या आधारे निवडणुकीत मतदान केले जात असून युवा नी अशा बाबी विचारात न घेता योग्यतेच्या आधारे प्रतिनिधी निवडून द्यावा असे आवाहन जिल्हापरिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी निधी चौधरी ह्यांनी युवकांना केले.
भारत निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात ७ व्या राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अभिजित बांगर, तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, पोलीस अधिक्षिका शारदा राऊत, प्रियांका मीना, उपजिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन, उमेश बिरारी, तहसीलदार महेश सागर, उपप्राचार्य डॉ.किरण सावे ई. उपस्थित होते.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ६८ वर्षाच्या काळात आपण काय मिळवले असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. मात्र युवांच्या सहाय्याने बनलेल्या सुदृढ लोकशाहीमुळे आज आपण निष्पक्षपणे निवडणूक प्रक्रि या पार पाडू शकतो, असे सांगताना आजही शेजारच्या देशात लोकशाही सक्षम होऊ शकलेले नसल्याचे आपण पाहत असल्याचे मुख्यधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी उल्लू (घुबड) आणि हंस ह्याची गोष्ट सांगून जाती धर्माच्या आधारे होणारी लोकप्रतिनिधीं निवडीची पद्धत बदलून योग्य, सक्षम, अभ्यासू लोकप्रतिनिधी निवडून देण्याची ताकद युवाशक्तीत असल्याने त्यांनी ती पार पाडावी असे आवाहन केले.तर भारत देशात इतक्या जाती, धर्म, भाषा असताना सर्व नागरिक एकजुटीने राहत आहेत, असे त्या म्हणाल्या. (वार्ताहर)