सापांना जीवनदान देणारा अवलिया
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 12:52 AM2019-08-11T00:52:09+5:302019-08-11T00:52:23+5:30
साप म्हटले की अनेकांना धडकी भरते. अनेकदा त्यांना मारण्यासाठी हात सरसावतात.
- वसंत भोईर
वाडा - साप म्हटले की अनेकांना धडकी भरते. अनेकदा त्यांना मारण्यासाठी हात सरसावतात, मात्र लहानपणी सापांना विनाकारण मारताना त्याने पाहिले आणि ठरवले विनाकारण आपल्याला त्रास न देणा-या सापांचे आपण रक्षण करायचे आणि सुरू झाला प्रवास एका सर्प रक्षकाचा !
वाडा तालुक्यातील चिखले येथील सागर पाटील या तरूणाने आजपर्यंत शेकडो सापांचे प्राण वाचवले आहेत. सागर याने आजपर्यंत नाग, मण्यार, अजगर, फोडसा, कांबळ्या अशा विषारी सापांना पकडून जंगलात सुरक्षितस्थळी सोडले आहे. स्वत:चे अन्न शोधण्यासाठी बाहेर पडणारे साप भीतीपोटी व अंधश्रध्देपायी माणसाकडून विनाकारण मारले जातात.
खरं तर प्रत्येक जीव हा अन्नसाखळीतील व पर्यायाने पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यांना मारून आपण कळत नकळत पर्यावरण संतुलनावरच घाला घालत आहोत. अलिकडच्या काळात सापांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून वैविध्यतेचे प्रमाणही कमी झाले आहे. निसर्गचक्र सुरळीतपणे चालण्यासाठी साप वाचवणे गरजेचे आहे. यासाठीच मी सापांच्या रक्षण करण्याचे ठरवले आहे असे सागर सांगतो.
तालुक्यातील विविध गावांमधून त्याने दोनशेहून अधिक साप पकडले असून ते वाडा वन विभागाच्या मदतीने जंगलात सुरक्षितस्थळी सोडले आहेत. कुणीही सापांना मारू नये, जर आपल्या परिसरात साप आढळून आल्यास माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सागर पाटील यांनी केले आहे.