कुडूस नाक्यावर युवासेनेचा चक्का जाम
By admin | Published: October 27, 2015 12:03 AM2015-10-27T00:03:54+5:302015-10-27T00:03:54+5:30
भिवंडी-वाडा-मनोर या रस्त्याचे काम अपूर्ण तसेच निकृष्ट दर्जाचे झालेले असतानाही या रस्त्यासाठी टोल आकारला जात आहे.
वाडा : भिवंडी-वाडा-मनोर या रस्त्याचे काम अपूर्ण तसेच निकृष्ट दर्जाचे झालेले असतानाही या रस्त्यासाठी टोल आकारला जात आहे. त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत टोल नाके बंद करावेत, या मागणीसाठी युवासेनेने सोमवारी कुडूस नाका येथे चक्का जाम छेडीत प्रशासनाला जाब विचारला. या वेळी एक तास महामार्ग रोखून धरला होता. त्यामुळे वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे, उपजिल्हाप्रमुख अरुण पाटील यांनी केले. भिवंडी-वाडा-मनोर या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा ठेका शासनाने बांधा, वापरा व हस्तांतरित करा, या तत्त्वावर सुप्रीम कंपनीला दिला आहे. त्यासाठी २२ महिन्यांचा कालावधी कंपनीला दिला होता. मात्र, चार वर्षे उलटूनही रस्त्याचे काम अपूर्ण तर आहेच, पण झालेले कामही निकृष्ट दर्जाचे झाल्याने हा रस्ता पूर्णपणे खड्ड्यांत गेला आहे. या खराब कामामुळे येथे नित्याचीच वाहतूककोंडी होत असते. तसेच खड्ड्यांमुळे वाहनचालकही त्रस्त झाले आहेत. यामुळे अनेक अपघात झाले असून आतापर्यंत ३०० निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप या वेळी शिवसेनेने केला.
या आंदोलनाची दखल वाड्याचे तहसीलदार संदीप चव्हाण यांनी घेऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागाने अपूर्ण व निकृष्ट कामाचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला असून त्या बाबतीत कार्यवाही सुरू असल्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. तर, ३१ तारखेपर्यंत टोल बंद न केल्यास १ तारखेला शिवसैनिक हातात कायदा घेऊन टोल नाके बंद करतील, असा गंभीर इशारा जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे यांनी प्रशासनाला दिला आहे.
या आंदोलनात शिवसेनेचे नेते निलेश गंधे, सुनील पाटील, चंद्रकांत पष्टे, कांतिलाल देशमुख, सचिन पाटील, प्रकाश केणे, निलेश पाटील, महिला तालुकाध्यक्ष छाया भोईर, जि.प. सदस्या भारती कामडी, माजी जिल्हा परिषद सदस्या दिव्या म्हसकर, अजिंक्य पाटील आदींसह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. या वेळी सुप्रीम कंपनीच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी झाली. (वार्ताहर)