विरार हत्याकांडातील आरोपी जेरबंद, चेंबर चोकोप झाल्याने दुर्गंधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 01:17 AM2019-01-24T01:17:13+5:302019-01-24T01:17:19+5:30
विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटी येथे एका इमारतीच्या ड्रेनेज चेंबरमध्ये मानवी मृतदेहाचे तुकडे आढळल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली.
वसई : विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटी येथे एका इमारतीच्या ड्रेनेज चेंबरमध्ये मानवी मृतदेहाचे तुकडे आढळल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरु वात केली. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, आपल्या मित्राची हत्या आर्थिक देवाणघेवाणीतून केली असल्याचे आरोपीने सांगितले आहे.
विरार पश्चिमेला असणाऱ्या ग्लोबल सिटीतील बछराज पॅरडाइज सोसायटीच्या ‘सी’ विंगच्या ड्रेनेज चेंबरमध्ये मृतदेहाचे तुकडे मंगळवारी दुपारी आढळले. या इमारतीमधील चेंबर चोकअप झाले तेव्हा रहिवाशांनी तक्र ार केली. चेंबर उघडले असता हा प्रकार समोर आला. एखाद्या फ्लॅटच्या टॉयलेटमधून मृतदेहाचे तुकडे टाकून फ्लश केले व ते तुकडे चेंबरमध्ये अडकले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला होता. चेंबर चोकअप झाल्यामुळे दुर्गंधी येऊ लागली होती.
याबाबत उपविभागीय अधिकारी जयंत बजबळे यांनी बुधवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन या हत्याकांडाचा शउलगडा करण्यात पोलिसांना यश आले असल्याचे सांगितले. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव गणेश कोलटकर (५८) असून ते मीरा रोड येथे राहणारे होते. तो बेपत्ता असल्याची तक्र ार नयानगर पोलिस ठाण्यात त्यांच्या कुटूंबीयांकडून देण्यात आली होती. मुंबई-वाकोला, सांताकृझ येथे राहणाºया पिंटू शर्मा नामक व्यक्तिसोबत आर्थिक व्यवहारातून त्यांची हत्या करण्यात आली आहे.
आरोपीने हत्या केल्यानंतर मृत शरीराचे काही भाग हॅक्सोब्लेडने कापून बाथरूमच्या ड्रेनेजमधून फ्लश केले होते.तर उर्वरीत भाग रेल्वे प्रवासादरम्यान व इतर ठिकाणी फेकून दिले होते. येथील ५० टक्के मानवी अवयव पोलिसांनी जप्त केले असल्याचे सांगितले. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी जयंत बजबळे यांनी आरोपीला अटक केली असून कलम ३०१,२०१ अन्वये गुन्हा दाखल केल्याचे सांगितले.
>कोलटकरची टाळाटाळ; साठ हजारासाठी निघृण हत्या
या इमारतीमध्ये ६०२ नंबरचा फ्लॅट आरोपी पिंटू शर्मा या शेअर दलालाने काही दिवसांपूर्वी भाड्याने घेतले होता. मयत गणेश कोलटकर (५८) याला पिंटू शर्मा याने एक लाख रूपये दिले होते. त्यापैकी चाळीस हजार रूपये गणेश कोल्हटकर याने पिंटू शर्मा याला दिले होते. उर्वरित साठ हजार देण्यासाठी तो कोलटकर याच्याकडे तगादा लावत होता. मात्र, कोलटकर याने आता मला लग्न करायचे आहे असे सांगून टाळटाळ केल्यामूळे या दोघांमध्ये बाचाबाची झाली असावी व त्यात कोलटकर याची हत्या केली असल्याचे तपासात समोर आले आहे.