जिल्हा परिषदेची शिलटे पहिली तंबाखूमुक्त शाळा; पालघर तालुक्यात पटकावला मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 11:49 PM2021-01-25T23:49:21+5:302021-01-25T23:49:32+5:30
९ निकष पूर्ण, तंबाखू नियंत्रणावर आधारित उपक्रम राबविले. शाळेच्या १०० मी. यार्ड परिसरात तंबाखू विक्री व सेवन करणाऱ्या व्यक्तीला दंड आकारण्यात येईल,
पालघर : जिल्ह्यातील पालघर पंचायत समितीअंतर्गत जिल्हा परिषद शाळा, शिलटे (केंद्र-माकणे) या शाळेने तंबाखूमुक्त अभियानाचे ९ निकष पूर्ण करून तालुक्यातील ‘पहिली तंबाखूमुक्त शाळा’ होण्याचा मान पटकावला आहे.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग पालघर, तंबाखू नियंत्रण उपक्रम कार्यक्रम, सलाम मुंबई फाउंडेशन व नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा, खासगी शाळा, महाविद्यालयात तंबाखूमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांची एकदिवसीय ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी लता सानप, सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्यावतीने आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळा लवकरात लवकर तंबाखूमुक्त कराव्या, असे आवाहन करण्यात आले होते. शिलटे शाळेचे प्रमुख शिक्षक अशोक किणी व उपशिक्षिका स्वेजल म्हात्रे यांनी ग्रामपंचायत, शिलटे, शाळा व्यवस्थापन समिती शाळा, शिलटे ,पालकवर्ग व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने या निकषांची पूर्तता केली. सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली. तंबाखू नियंत्रणावर आधारित उपक्रम राबविले. शाळेच्या १०० मी. यार्ड परिसरात तंबाखू विक्री व सेवन करणाऱ्या व्यक्तीला दंड आकारण्यात येईल, याबाबत गावात जागृती केली. शाळेच्या १०० यार्डपर्यंत परिसर दिसेल असा पिवळ्या रंगाने रेखांकित करून तेथे तंबाखूमुक्त क्षेत्र असे लिहिले.
यासाठी त्यांना सलाम मुंबई फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक जयेश माळी, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक मिलिंद पाटील, पालघरचे गटशिक्षणाधिकारी दीपक पिंपळे, सर्व विस्तार अधिकारी व माकणे केंद्राच्या केंद्रप्रमुख दीपिका नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.