जि.प. अध्यक्षपदी खरपडे, उपाध्यक्ष गंधे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 03:05 AM2017-08-15T03:05:21+5:302017-08-15T03:05:23+5:30
जिल्हा परिषदेच्या उर्वरित अडीच वर्षासाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी भाजपचे विजय सु. खरपडे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे निलेश गंधे ह्यांची बिनविरोध निवड झाली.
हितेन नाईक ।
पालघर: जिल्हा परिषदेच्या उर्वरित अडीच वर्षासाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी भाजपचे विजय सु. खरपडे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे निलेश गंधे ह्यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदासाठी प्रारंभी सेनेने प्रकाश निकम यांचे नाव निश्चित केले होते. परंतु भाजप ने विरोध केल्याने ऐनवेळी त्यांना रिंगणातून बाहेर पडावे लागले व गंधेंची लॉटरी लागली.
पालघर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांची पहिल्या अडीच वर्षाची कारकीर्द संपुष्टात आल्या नंतर पुढील अडीच वर्षासाठी आज निवडणूक झाली. जिल्हा परिषदेत भाजप चे २१, शिवसेनेचे १५ , बहुजन विकास आघाडीचे १०,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ५, राष्ट्रवादी ४, काँग्रेस १ आणि अपक्ष १ असे एकूण ५७ सदस्य निवडून आले होते. राज्यात भाजप-शिवसेने मध्ये युती असली तरी त्यांच्यातील अंतर्गत वाद जगजाहीर होता.शिवसेना सत्तेच्या हव्यासापोटी भाजपसोबत फरफटत जात असल्याचा आरोप विरोधी पक्षा कडून केला जात असल्याच्या पाशर््वभूमीवर पालघर मध्येही ह्याचे पडसाद उमटत होते. दुसºया अडीच वर्षाच्या कारकिर्दीत उपाध्यक्षपदासाठी प्रकाश निकम यांच्या नावाचे पत्र मातोश्री वरून आले असतांना एन वेळी पालकमंत्र्यांनी केलेल्या विरोधामुळे त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागल्याची चर्चा होती. त्यामुळे दोघांमधून विस्तवही जात नसल्याचे निदर्शनास येत होते.
भाजपने अध्यक्षपदासाठी विजय खरपडे यांचे नाव घोषित केले होते. तर उपाध्यक्षपदा साठी सेनेतून गटनेते निलेश गंधे, प्रकाश निकम आणि घनश्याम मोरे ह्यांची नावे मातोश्रीवर पाठविण्यात आली होती. वाडा विधानसभा निवडणुकीत सेनेचे उमेदवार म्हणून प्रकाश निकम यांच्याकडे पाहिले जात असल्याने त्यांना उपाध्यक्षपद मिळाल्यास सेनेची ताकद वाढून ते पालकमंत्र्यांना डोईजड ठरू शकतात. ह्या कारणाने भाजप मधून त्यांना मोठा विरोध होता. निकम यांच्या नावाचा आग्रह धरल्यास बिनशर्त पाठिंबा दिलेल्या बविआशी भाजप जवळीक साधेल व सेनेला सत्तेतून बाहेर काढेल, अशी भीती सेनेला होती. त्यामुळे युती तोडायची नाही असे ठरवून उपाध्यक्ष पद व एक सभापती पद पदरी पाडून निकम यांना माघार घेण्यास सांगितले.उपाध्यक्षपदा साठी राष्ट्रवादीचे दामोदर पाटील ह्यांनीही अर्ज भरला होता,तो त्यांनी मागे घेतल्याने गंधे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.