जि.प. शिक्षकांना वेळेत पगार नाही
By Admin | Published: October 24, 2015 11:19 PM2015-10-24T23:19:41+5:302015-10-24T23:19:41+5:30
पालघर जिल्ह्यातील जि.प. शिक्षकांना दोन महिन्यांपासून वेळेत पगार मिळत नसल्याने जिल्हा परिषद शिक्षकांची घोर निराशा झाली आहे. पालघर जिल्हा झाल्यापासून येथील
जव्हार : पालघर जिल्ह्यातील जि.प. शिक्षकांना दोन महिन्यांपासून वेळेत पगार मिळत नसल्याने जिल्हा परिषद शिक्षकांची घोर निराशा झाली आहे. पालघर जिल्हा झाल्यापासून येथील शिक्षकांची दरमहिन्याला पगाराची समस्या निर्माण होत आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार १ तारखेलाच होतील, अशी घोषणा करूनही आॅनलाइन तसेच आॅफलाइन बिलांच्या गोंधळामुळे जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार वेळेत होत नसल्याने संपूर्ण आर्थिक नियोजन ढासळून गेले आहे. अनेक शिक्षकांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
पगार वेळेत होत नसल्यामुळे बँक तसेच पतसंस्थांकडून घेतलेल्या कर्जाच्या रकमेचे दोन ते तीन हप्ते थकले आहेत. तसेच गृहकर्ज वेळेवर न भरल्याने अनेक शिक्षकांना बँकेच्या नोटिसाही आलेल्या आहेत. या वर्षी गणपती, दसरा हे सर्वच सण पगार दिरंगाईमुळे शिक्षकांना व्यवस्थित साजरे करता आले नाहीत. पगाराची हीच परिस्थिती राहिली तर कुटुंब आणि मुलांसोबत दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न येथील शिक्षकांना पडला आहे. पालघर जिल्हा परिषद प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच पगार वेळेत होत नसल्याचा आरोप येथील महाराष्ट्र स्वाभिमान शिक्षक संघटना, जव्हार शाखा यांनी केला आहे. जिल्हा परिषद शिक्षकांचा पगाराचा प्रश्न लवकरच सोडण्याची मागणी स्वाभिमान शिक्षक संघटना, जव्हार यांनी केली आहे. अन्यथा, प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमान शिक्षक संघटनेने दिला आहे. (वार्ताहर)