वाशिम जिल्ह्यातील १.३० लाख शेतकरी स्वत: नोंदविणार सातबारावर माहिती
By दादाराव गायकवाड | Published: September 6, 2022 01:58 PM2022-09-06T13:58:28+5:302022-09-06T13:58:50+5:30
राज्यात मागील वर्षापासून ई-पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येत आहे.
राज्यात मागील वर्षापासून ई-पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या ई-पीक पाहणीमध्ये पीक पेरणीची माहिती स्वत: शेतकऱ्याला मोबाईल ॲपव्दारे गाव नमुना सातबारामध्ये नोंदविण्यासाठी उपलब्ध करुन देण्याच्या कार्यक्रमाची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हयात एकूण ८०९ गावे असून ई-पीक पाहणीची विशेष मोहिम १३ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. १ लक्ष ३० हजार ९२२ शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी नोंदविण्याचे उदिष्ट आहे.
मागील वर्षी ई-पीक पाहणीसाठी मोबाईल ॲप्लीकेशन प्रथमच शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात आले. उशिरा जनजागृती होऊनही जिल्ह्यातील ५० टक्के शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील पिकाची नोंद गाव नमुना सातबारावर ई-पीक पाहणी मोबाईल ॲपव्दारे नोंदविली आहे. या खरीप हंगामात ई-पीक पाहणी नोंदविण्याची मोहिम १ ऑगस्टपासून सुरु करण्यात आली आहे. या हंगामात १०० टक्के नोंदणी ई-पीक पाहणी ॲप्लीकेशनव्दारे करण्याचे शासनाचे निर्देश आहे.
त्याअनुषंगाने ई-पीक पाहणी मोबाईल ॲप्लीकेशनची माहिती व जनजागृती सर्व शेतकऱ्यांना व्हावी व त्यांना स्वत: शेतातील पिकाची माहिती गाव नमुना सातबारामध्ये नोंदविण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतूने १३ सप्टेंबर रोजी मोहिम स्वरुपात शेतकऱ्यांनी पीक पेरा नोंदणी पुर्ण करण्याचे उदिष्ट निश्चित केले आहे. या दिवशी सुक्ष्म नियोजन करुन ही मोहिम यशस्वी करण्याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांवर सोपविण्यात आली आहे.
मोहिमेच्या यशस्वितेसाठी गावनिहाय नियोजन
ई-पीक पाहणीची विशेष मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक गावनिहाय नियोजन व जनजागृती करुन तलाठी, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, रोजगार सेवक, रेशन दुकानदार, शेतीमित्र, कोतवाल, प्रगतीशिल शेतकरी, आपले सरकार सेवा केंद्र चालक, सीएससी केंद्र चालक, संग्राम केंद्र चालक, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, युवक मंडळाचे पदाधिकारी अशा स्वयंसेवकाची निवड करुन त्यांच्या सहाय्याने गावातील शेतकऱ्यांना पिक पेरा भरण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.