१ लाख विद्यार्थ्यांना घरपोच मिळाली चार लाख ५० हजार मोफत पाठ्यपुस्तके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 10:59 AM2020-06-28T10:59:41+5:302020-06-28T10:59:57+5:30
१ लाख विद्यार्थ्यांना २७ जूनपर्यंत साडेचार लाख पाठ्यपुस्तकांचे मोफत वाटप घरपोच करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिले ते आठवीतील सर्व माध्यमाच्या शिक्षण घेणाऱ्या जिल्ह्यातील १ लाख विद्यार्थ्यांना २७ जूनपर्यंत साडेचार लाख पाठ्यपुस्तकांचे मोफत वाटप घरपोच करण्यात आले. प्रतिबंधित क्षेत्रातील विद्यार्थ्यांनादेखील लवकरच घरपोच पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाणार आहे.
विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे, पाठ्यपुस्तकांपासून कुणीही वंचित राहू नये म्हणून समग्र शिक्षा अभियानातून शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिले ते आठवीतील सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण केले जाते. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने विद्यार्थी संख्येनुसार सात लाख ३ हजार ११२ पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविली होती. यामध्ये कारंजा तालुक्यातील १९ हजार ४४४ विद्यार्थ्यांना एक लाख ९ हजार ६९१ पाठ्यपुस्तके, मालेगाव तालुक्यात २० हजार ५९९ विद्यार्थ्यांना एक लाख १५ हजार ८७५ पाठ्यपुस्तके, मंगरूळपीर तालुक्यात १७ हजार ३४७ विद्यार्थ्यांना एक लाख ४९० पाठ्यपुस्तके, मानोरा तालुक्यात १६ हजार ५३३ विद्यार्थ्यांना ९२ हजार ३०९ पाठ्यपुस्तके, रिसोड तालुक्यात २६ हजार १०३ विद्यार्थ्यांना एक लाख १७ हजार ५३३ पाठ्यपुस्तके तर वाशिम तालुक्यात २९ हजार १७ विद्यार्थ्यांना एक लाख ६७ हजार २१४ पाठ्यपुस्तकांचा समावेश होता. जिल्ह्याला ५ लाख ९१ हजार ३८७ पाठ्यपुस्तके प्राप्त झाली. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर २७ जूनपर्यंत जिल्ह्यातील ८० टक्के विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके घरपोच देण्यात आली. काही सुरक्षित ठिकाणी शाळेत बोलावून जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप केली.
कोरोनाबाधित क्षेत्रात पाठ्यपुस्तके पोहचणार
जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके घरपोच पोहचविण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. पहिल्या टप्प्यात कोरोनामुक्त क्षेत्रातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. आता दुसºया टप्प्यात प्रतिबंधित क्षेत्रातील विद्यार्थ्यांपर्यंत पाठ्यपुस्तके कशी पोहचवायची यावर शिक्षण विभागाने मंथन केले. लवकरच ही पाठ्यपुस्तके घरपोच पोहचविण्यात येणार आहेत.
आॅनलाईन शिक्षणाचा विचार
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून नववी, दहावी, बारावीचा अपवाद वगळता उर्वरीत वर्गातील विद्यार्थ्यांना आॅनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याचा विचार सुरू असल्याचे जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती चक्रधर गोटे, प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी सांगितले. यासंदर्भात पालकांचे मत जाणून घेतले जाणार आहे.