१० लाख नागरिकांना मोफत मिळणार आयुर्वेद औषधी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 11:11 AM2020-07-06T11:11:39+5:302020-07-06T11:11:47+5:30
१० लाख नागरिकांना केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या होमिओपॅथी व आयुर्वेद औषधीचे लवकरच मोफत वाटप केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनाचा शिरकाव ग्रामीण भागातही होत असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील १० लाख नागरिकांना केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या होमिओपॅथी व आयुर्वेद औषधीचे लवकरच मोफत वाटप केले जाणार आहे.
अलिकडच्या काळात ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव होत आहे. भेरा, खेर्डा, तामशी, बोराळा हिस्से, शेमलाई, आसेगाव पेन, राजुरा, हिवरा रोहिला, वसंतनगर पोहरादेवी यासह अन्य ग्रामीण भागातही यापूर्वी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. आता सदर गावे कोरोनामुक्त झालेली आहेत. दरम्यान, कोरोनाचा धोका अजून संपलेला नसल्याने यापुढेही ग्रामीण भागात आरोग्य विभागातर्फे विशेष उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामविकास मंत्रालय यांचे निर्णयानुसार कोरोना ससंर्ग टाळण्यासाठी तसेच या आजारात रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने काही औषधांच्या शिफारसी केल्या आहेत. त्यापैकी अर्सेनिक अल्बम ३० व संशमनी वटी हे होमिओपॅथी व आयुर्वेदीक औषध कोरोना आजारात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते, अशी शिफारस करण्यात आल्याने या औषधाचा ग्रामीण भागातील १० लाख नागरिकांना मोफत पुरवठा लवकरच करण्यात येणार आहे. यासाठी १० दिवसांपूर्वीच निधीची तरतूदही करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार आहे. (प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात पुरेसा औषधी साठा
पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता तसेच कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये पुरेशा प्रमाणात सर्दी, खोकला, ताप, अतिसार यासह अन्य महत्वाचा औषधी साठा उपलब्ध करण्यात आला आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
आरोग्य मंत्रालयाच्या शिफारशीनंतरच औषधी वाटपाचा निर्णय
रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यात महत्वपूर्ण असलेल्या काही औषधांची शिफारस भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने केली आहे. त्यातीलच औषधीचे मोफत वाटप आरोग्य विभागातर्फे केले जाईल.
ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होत असल्याने नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आयुर्वेद व होमिओपॅथी औषधी्नचे वाटप ग्रामीण भागातील १० लाख नागरिकांना केले जाणार आहे.
- चक्रधर गोटे,
आरोग्य सभापती, जि.प. वाशिम