दरोड्याच्या तयारीत असलेल्या १० जणांना शस्त्रासह पकडले; १३.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
By संदीप वानखेडे | Published: September 27, 2023 02:52 PM2023-09-27T14:52:55+5:302023-09-27T14:53:17+5:30
काटा रेल्वे स्टेशन परिसरातील घटना
वाशिम : घातक शस्त्रासह कुठेतरी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या १० जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. काटा रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या एका पडीक ठिकाणावरून दहा जणांना ताब्यात घेतले तर अंधाराचा फायदा घेवून काही दरोडेखोर पसार झाले.
पांगरी धनकुटे ते काटा रोडवरील रेल्वे पुलाच्या समोर काही इसम २५ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास संशयितरीत्या एक बोलेरो चारचाकी वाहन व काही दुचाकी घेऊन घातक शस्त्रांसह कुठेतरी दरोडा घालण्याच्या तयारीत दबा धरून बसल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. यावरून तीन वेगवेगळे पथक कारवाईसाठी घटनास्थळाकडे रवाना झाले. मोटारसायकल व एक बोलेरो कारने रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या पडीक जागेमध्ये शस्त्रासह दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरून बसले असल्याची खात्री झाल्याने पोलीस पथकांनी त्यांना घेराव घालून १० दरोडेखोरांना जागीच ताब्यात घेतले तर काही इसम हे अंधाराचा फायदा घेऊन शेतशिवारामध्ये पळून गेले.
पंचासमक्ष घेतलेल्या झडतीत दरोडेखोरांच्या ताब्यातून दरोडा टाकण्याकरिता लागणारे साहित्य लोखंडी कत्ता, धारदार चाकू, लोखंडी रॉड, कोयता, वेळूच्या काठ्या, मिर्ची पावडर मिळून आले तसेच चारचाकी गाडी बोलेरोची तपासणी केली असता त्यामध्ये पांढऱ्या रंगाची दोरी, लोखंडी रॉड, स्क्रू ड्रायव्हर मिळून आले.दरोडेखोरांच्या ताब्यातून १ बोलेरो चारचाकी, १३ मोटार सायकली, ७ मोबाईल संच व उपरोक्त साहित्य असा १३ लाख सहा हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाशिम ग्रामीण पोलिस स्टेशन येथे कलम ३९९, ४०२ भादंवि सहकलम ४, २५ शस्त्र अधिनियम अन्वये दरोडेखोरांवर गुन्हा नोंदविण्यात आला.
यांच्यावर दाखल केला गुन्हा
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या विनोद मच्छिंद्र चव्हाण (३०), शुभम अनंता चव्हाण (२०), आकाश नामदेव काकडे (२४), गौतम भगवान गायकवाड, (३८), संदीप मच्छिंद्र चव्हाण (४०) सर्व रा.डव्हा, (ता.मालेगाव, जि.वाशिम), राहुल विश्वास पवार (२२) रा.सुदी, ता.मालेगाव, रवी डीगांबर पवार (२८) रा.आमखेडा, ता.मालेगाव, लक्ष्मण भागवत चव्हाण (४९) रा.धारकाटा, ता.मालेगाव, विशाल जगदीश पवार (२१) व राधेश्याम चुनिलाल पवार (२९) रा.सावरगाव बर्डे, ता.मालेगाव अशा दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.