लॉकडाउनच्या कालावधीत कापड बाजाराला १०० कोटींचा फटका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 11:37 AM2020-05-05T11:37:34+5:302020-05-05T11:37:40+5:30
४ मे पासून कापड दुकाने उघडल्याने पहिल्याच दिवशी कापड खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.
- शिखरचंद बागरेचा
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर २४ मार्च ते ३ एप्रिल या दरम्यान कापड बाजार बंद राहिल्याने जिल्ह्यात जवळपास १०० कोटींचा फटका कापड व्यवसायाला बसल्याचा दावा व्यावसायिकांनी ४ मे रोजी केला. दरम्यान, ४ मे पासून कापड दुकाने उघडल्याने पहिल्याच दिवशी कापड खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २४ मार्चपासून लॉकडाउन व संचारबंदी लागू आहे. लॉकडाउनमुळे लग्नसराईचे अर्ध्याहून अधिक मुहूर्त हातचे निघून गेले आहेत. यंदा लग्नसराईचा हंगाम पुढच्या वर्षावर लोटला गेला आहे. या अनुषंगाने या हंगामातील मोठा मानला जाणारा लग्नाचा बस्ता खरेदी होणार नसल्याने जिल्ह्यातील रेडिमेड व कापड व्यवसायाला सुमारे १०० कोटींच्यावर फटका बसला असल्याचे कापड व रेडिमेड व्यावसायिकांनी सांगितले. कापड व्यावसायिकांनी लग्नसराईचा हंगाम लक्षात घेऊन फेब्रुवारी महिन्यातच विविध प्रकारच्या कापडांची खरेदी करून या लग्नसराईसाठी बाजारपेठ सज्ज केली होती. तथापि अचानकपणे आलेल्या कोरोना संकटामुळे सार्वजनिक व मोठ्या प्रमाणात होणारे लग्नसोहळे रद्द झाल्याने याची जबर किंमत कापड बाजाराला चुकवावी लागली. जवळपास १०० कोटींचा फटका बसल्याचे व्यावसायिक नंदकिशोर पाटील यांनी सांगितले.
कापड खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी
४ मे पासून कापड दुकाने सुरू करण्याला मुभा मिळाली. सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत कापड दुकाने सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी नागरिकांनी कापड खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी केल्याचे वाशिम शहरात दिसून आले. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना ग्राहकांना देण्यात आल्या. कापड दुकानांसमोर फिजिकल डिस्टन्सिंगसाठी पांढरे वर्तुळ रंगविण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने ४ मे रोजी दिले.
कर्जाची परतफेड करण्याची चिंता
प्रत्येकाच्या दुकानांमध्ये कामावर कामगार असून त्यांना घरातूनच पगार द्यावा लागत आहे. दुसरीकडे लग्नसराईचा हंगाम निघून गेल्याने आता कापड बाजाराला झळाळीदेखील नाही. अशा बिकट परिस्थितीत कापड व्यवसाय अडकला आहे. वाशिम शहरात रेडीमेड गारमेंट्सचे आठ ते दहा मोठे शोरूम आहेत. रेडिमेडची २५ ते ३० दुकाने तर आहेराची जवळपास एवढीच दुकाने आहेत. कर्जाची परतफेड कशी करावी, याची चिंता व्यावसायिकांना लागली.