कारंजातून २५ लाख रुपये किमतीचा १०० किलो गांजा जप्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 17:37 IST2019-11-03T17:36:56+5:302019-11-03T17:37:08+5:30
गुन्हे शाखेच्या पथकाने २५ लाख रुपये किमतीचा १०० किलो ३५० ग्राम गांजा जप्त केला.

कारंजातून २५ लाख रुपये किमतीचा १०० किलो गांजा जप्त!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील कारंजा येथून शेलुबाजारकडे जाणारे वाहन अडवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २५ लाख रुपये किमतीचा १०० किलो ३५० ग्राम गांजा जप्त केला. ही कारवाई शनिवार, २ नोव्हेंबर रोजी रात्री उशीरा करण्यात आली.
नागपूरवरून पुणे येथे काही इसम एम.एच. २९ आर. ७४२० आणि एम.एच. ०३ बी.जे. ७४०६ या दोन वाहनांव्दारे गांजा घेऊन जाणार असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांनी तीन वेगवेगळे पथक तयार करून कारंजा ते शेलुबाजार रस्त्यावरील कोळी फाट्यानजिक सापळा रचून सदर वाहनांवर पाळत ठेवली. दरम्यान, रात्री १०.३० वाजताच्या सुमारास दोन्ही वाहने निदर्शनास येताच त्यांना थांबवून पंचासमक्ष झाडाझडती घेण्यात आली असता, वाहनांमध्ये १०० किलो ३५० ग्राम गांजा (किंमत २५ लाख ८ हजार ७५० रुपये) आढळून आला. यासह ९ मोबाईल फोन, इनोव्हा कंपनीची गाडी, आय २० कंपनीची गाडी व रोख रक्कम असा एकंदरित ४३ लाख २८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
याप्रकरणी आशुतोष गायकवाड, विजय शिंदे, प्रितेश शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, महेश पगडे (सर्व रा. मुखई, ता. शिरूर, जि. पुणे) आणि यश पवार (रा. जातेगाव बु. ता. शिरूर, जि. पुणे) अशा सहा जणांवर कारंजा शहर पोलिस स्टेशन येथे अंमली औषधीद्रव्ये व मन:प्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम २० व २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.