मालेगाव येथील जनता कर्फ्यूला व्यापाऱ्यांचा १०० टक्के प्रतिसाद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 04:01 PM2020-07-13T16:01:37+5:302020-07-13T16:02:01+5:30
पहिल्याच दिवशी व्यापारी, नगर पंचायतसह नागरिकांचा १०० टक्के प्रतिसाद लाभला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने, कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून मालेगाव येथे १३ ते १५ जुलै या दरम्यान जनता कर्फ्यू पाळला जात असून, पहिल्याच दिवशी व्यापारी, नगर पंचायतसह नागरिकांचा १०० टक्के प्रतिसाद लाभला. अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ कडकडीत बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.
जिल्ह्यात मेडशी येथे पहिला कोरोनाबाधीत रुग्ण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळला होता. जून महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. जुलै महिन्यात यामध्ये झपाट्याने वाढ होत असून, मालेगाव शहरातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. परराज्य, परजिल्ह्यातून मालेगाव शहर व तालुक्यात परतलेल्या व परतत असलेल्या नागरिकांमुळे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येते. शहरात गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. मालेगाव शहरात रॅपिड अॅन्टिजन टेस्टिंग सुरू करण्यात आली. पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने घेणे व त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करणे सुरू आहे. दुसरीकडे लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही, मालेगाव बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होत आहे. यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढला असून, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापारी, मोबाईल असोसिएशन, नगर पंचायतचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य आदींनी पुढाकार घेतला असून, १३ जुलैपासून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूची हाक केली. त्यानुसार १३ जुलै रोजी शहरातील बाजारपेठेतील सर्व दुकाने कडकडीत बंद असल्याचे दिसून आले. मेडीकल, दवाखाने व काही अत्यावश्यक सेवेचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही प्रकारची दुकाने उघडण्यात आली नाहीत. त्यामुळे पहिल्या दिवशी मालेगाव शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. किराणा असोसिएशन, मोबाईल असोसिएशन, सराफा असोसिएशन, कपडा असोसिएशन, कृषी व्यवसायिक संघटना, स्टेशनरी व्यवसायिक, भाजीपाला यासह मालेगावकर, नगर पंचायतचे पदाधिकारी, व्यापारी, नागरिक यामध्ये सहभागी झाल्याने जनता कर्फ्यूला १०० टक्के प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. शहरातील प्रमुख चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.