वाशिम जिल्ह्यातील १००० अपात्र शिधापत्रिका रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 07:38 PM2018-11-15T19:38:13+5:302018-11-15T19:42:06+5:30
७७५ स्वस्त धान्य दुकानांतून ई-पॉसद्वारे वितरण : रोख पोवती घेण्याचे आवाहन
वाशिम : सार्वजनिक वितरण प्रणालीच्या संगणकीकरणामुळे जिल्ह्यात ई-पॉस मशीनद्वारे धान्य व केरोसीन वितरीत करण्यात येत असून, अपात्र ठरलेल्या एक हजार शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवार, १५ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सहाय्यक पुरवठा अधिकारी सुनील देशमुख, निरीक्षण अधिकारी नीलेश राठोड आदी उपस्थित होते.
वानखेडे म्हणाले, जिल्ह्यात सर्व ७७५ स्वस्त धान्य दुकानांमध्ये ई-पॉस मशीनद्वारे वितरण सुरु झाले आहे. याकरिता शिधापत्रिका व आधारकार्ड लिंकिंग करण्यात आल्याने बोगस शिधापत्रिका शोधण्याच्या कामाला गती मिळाली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात १००० शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या असून रद्द केलेल्या शिधापत्रिकाधारकांऐवजी पात्र लाभार्थ्यांचा समावेश त्यांना अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व योजनांचे गहू व तांदूळ याचे मासिक नियतन ६३५५ मे. टन एवढे असून ई-पॉस मशीनमुळे आॅक्टोंबर २०१८ अखेरपर्यंत अन्नसुरक्षा योजनेतील ३३३ मे. टन धान्य तर शेतकरी लाभार्थी कुटुंबातील १२०० मे. टन धान्याची अशी एकूण १५३३ मे. टन धान्याची बचत झाल्याचा दावाही त्यांनी केला.
जिल्ह्यात गॅस स्टँपिंग मोहीम राबविण्यात येत आहे. ज्या लाभार्थ्यांकडे गॅस जोडणी आहे, त्यांचा केरोसीन कोटा बंद करण्याची कार्यवाही प्राधान्याने करण्यात येत आहे. या मोहिमे दरम्यान गॅस जोडणी उपलब्ध असूनही चुकीचे हमीपत्र सादर करणाºया लाभार्थ्यांविरुध्द कार्यवाही करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. जानेवारी २०१८ मध्ये जिल्ह्याला शासनाकडून ६ लाख ४८ हजार लिटर केरोसीनचे नियतन मंजूर झालेले आहे. ते आजरोजी ७२ हजार लिटर एवढे आहे, असेही ते म्हणाले.
८ रेशन दुकाने रद्द
धान्य वितरणातील अनियमितता व इतर वेगवेगळ्या कारणांमुळे जिल्ह्यातील ८ रास्तभाव दुकाने रद्द करण्यात आली आहेत. तसेच अन्न दिनादिवशी बंद असलेल्या एकूण ११३ रास्तभाव दुकानांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ३ किरकोळ केरोसीन परवाने रद्द करण्यात आले आहेत, तसेच ५ किरकोळ केरोसीन परवान्यांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आली आहे.
रोख पावती घेण्याचे आवाहन
सर्व शिधापत्रिकाधारकांनी रास्तभाव दुकानातून अन्नधान्य व केरोसीन घेत असताना दुकानदाराकडे रोख पावतीचा आग्रह धरावा. रोखपावती घेतल्याशिवाय अन्नधान्य अथवा केरोसीन घेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.