तीन महिन्यांत आढळले १० हजार कोरोनाबाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 11:24 AM2021-04-04T11:24:05+5:302021-04-04T11:24:24+5:30
Corona Cases in Washim : ३ एप्रिलअखेर बाधितांचा एकूण आकडा १६ हजार ६९९ वर पोहोचला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसागणिक वाढतच चालले आहे. दैनंदिन आढळणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३०० पेक्षा अधिक असून, नव्या वर्षांतील तीन महिन्यात १० हजार २७ रुग्ण आढळले असून, ३ एप्रिलअखेर बाधितांचा एकूण आकडा १६ हजार ६९९ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात १ जानेवारी २०२० रोजी कोरोना बाधित रुग्णांचा एकूण आकडा ६ हजार ६७२ होता. १ फेब्रुवारी रोजी तो ४८२ ने वाढून ७ हजार १५४ झाला; मात्र १ मार्च रोजी हा आकडा तब्बल १ हजार ९१६ ने वाढून ९ हजार ७० झाला; तर १ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत ७ हजार ३२८ ने वाढून १६ हजार ३९८ झाला, तसेच २ व ३ एप्रिल या दोन दिवसांत ६२४ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून, ३ एप्रिलअखेर बाधितांचा एकूण आकडा १६ हजार ६९९ वर पोहोचला आहे. बाधितांचा दैनंदिन आकडा ३०० पेक्षा अधिकच असून, त्यात घट होणे अशक्य झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. या संकटावर नियंत्रण मिळविण्याकरिता सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. जिल्हाभरात कलम १४४ लागू असून, सर्व प्रकारची दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ८ या वेळेत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
रात्री ८ ते सकाळी ६ या वेळेत जमावबंदी लागू आहे. दुसरीकडे चौथ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या कोरोना लसीकरणालादेखील सुरुवात करण्यात आल्याने कोरोना संकटाचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा नागरिक बाळगून आहेत.
४६८ रुग्ण संस्थात्मक; तर २१९० रुग्ण गृह विलगीकरणात
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. त्यानुषंगाने प्रशासनाने काही खासगी रुग्णालयेही अधिग्रहीत केली आहेत. दरम्यान, ३ एप्रिलअखेर संस्थात्मक विलगीकरणात ४६८; तर गृह विलगीकरणात २१९० रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.