जिल्ह्यातील १०१ मंडल अधिकारी, तलाठ्यांना मिळणार ‘नवा लॅपटॉप’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:43 AM2021-04-02T04:43:07+5:302021-04-02T04:43:07+5:30
वाशिम : ई-महाभूमी अंतर्गत ई-फेरफार आज्ञावलीच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील संबंधित तलाठी व मंडल अधिकारी यांच्या लॅपटॉपची क्लाऊड सर्व्हरबरोबर जोडणी करण्यासाठी ...
वाशिम : ई-महाभूमी अंतर्गत ई-फेरफार आज्ञावलीच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील संबंधित तलाठी व मंडल अधिकारी यांच्या लॅपटॉपची क्लाऊड सर्व्हरबरोबर जोडणी करण्यासाठी तलाठी, मंडल अधिकाऱ्यांना लॅपटॉप खरेदीसाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. वाशिम जिल्ह्यातील ८४ तलाठी आणि १७ मंडल अधिकारी मिळून १०१ जणांना नवे लॅपटॉप मिळणार आहेत.
राज्यात ‘डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉर्डनायझेशन’ कार्यक्रमांतर्गत जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कार्यालयाकडून संगणकीय गा. न. नं. सातबारा, ८ अ, ई-फेरफार, ई-अभिलेख, आदी प्रकल्पांच्या आज्ञावली विकसित करण्यात आल्या आहेत. या आज्ञावलीमधील ई-फेरफार आज्ञावलीची अंमलबजावणी राज्यातील संबंधित तलाठी व मंडल अधिकारी यांच्या लॅपटॉपची क्लाऊड सर्व्हरबरोबर जोडणी करण्याची कार्यवाही तलाठी व मंडल अधिकारी यांच्याकडून करण्यात येते. यासाठी शासनाच्या १ सप्टेंबर २०२०च्या निर्णयान्वये नागपूर, भंडारा, अकोला, अहमदनगर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांसाठी १,०८१ लॅपटॉपच्या खरेदीसाठी ४ कोटी ८६ लाख ४५ हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे तर आता राज्यातील बारा जिल्ह्यांतील १,१५४ तलाठी व २१३ मंडल अधिकाऱ्यांसाठी एकूण १,३६७ लॅपटॉप खरेदी करण्यासाठी प्रत्येकी ४५ हजार रुपयेप्रमाणे एकूण ६ कोटी १५ लाख १५ हजार रुपये इतक्या खर्चाला स्वीय प्रपंजी लेख्यातील शिल्लक रकमेतून संबंधित जिल्हाधिकारी यांना वर्ग करण्यास ३१ मार्च रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ८४ तलाठी आणि १७ मंडल अधिकारी मिळून एकूण १०१ जणांना नवीन लॅपटॉप मिळणार आहेत.
---
पूर्वीचे लॅपटॉप बिघडल्याने येत होत्या अडचणी
जिल्ह्यात ई-महाभूमी अंतर्गत ई-फेरफार आज्ञावलीच्या अंमलबजावणीसाठी संबंधित तलाठी व मंडल अधिकारी यांच्या लॅपटॉपची क्लाऊड सर्व्हरबरोबर जोडणी करण्यासाठी पूर्वीही लॅपटॉप देण्यात आले होते; परंतु या लॅपटॉपचा वापर पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून होत असून, बहुतांश लॅपटॉप कालबाह्य झाले आहेत किंवा बिघडले आहेत. त्यामुळे नवे लॅपटॉप देण्याची मागणी केली जात होती.
---------------
कोट : ई-महाभूमी अंतर्गत ई-फेरफार आज्ञावलीच्या अंमलबजावणीसाठी तलाठी व मंडल अधिकारी यांच्या लॅपटॉपची क्लाऊड सर्व्हरबरोबर जोडणी करण्यासाठी नवीन लॅपटॉपची गरज आहे. यापूर्वी देण्यात आलेले बहुतांश लॅपटॉप कालबाह्य झाले आहेत. त्यामुळे नवे लॅपटॉप देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. आता १२ जिल्ह्यांतील १,१५४ तलाठी व २१३ मंडल अधिकाऱ्यांसाठी एकूण १,३६७ लॅपटॉप खरेदी करण्यासाठी ६ कोटी १५ लाख १५ हजार रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. त्यामुळे तलाठी, मंडल अधिकाऱ्यांना काम करणे सोपे होईल.
- श्याम जोशी,
राज्याध्यक्ष,
तलाठी, मंडल अधिकारी महासंघ
----------------
नवे लॅपटॉप मिळणारे मंडल अधिकारी - १७
नवे लॅपटॉप मिळणारे तलाठी - ८४
--------------
लॅपटॉपची तालुकानिहाय मागणी
तालुका तलाठी मंडल अधिकारी
कारंजा १५ ०३
वाशिम १४ ०४
मं. पीर १३ ०३
रिसोड १५ ०२
मालेगाव १३ ०३
मानोरा १४ ०२