लोकसभा निवडणुकीसाठी घरून मतदान करण्यासाठी १०१३ ज्येष्ठांचे अर्ज
By संतोष वानखडे | Published: April 8, 2024 03:05 PM2024-04-08T15:05:04+5:302024-04-08T15:05:53+5:30
Lok Sabha Election 2024 : निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे.
वाशिम : भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षांवरील ज्येष्ठ मतदारांना घरून मतदानाची सुविधा उपलब्ध केली आहे. यासाठी आवश्यक १२ (ड) अर्ज बीएलओंकडे सादर करण्याच्या अंतिम मुदतीत जिल्ह्यातील तीन विधानसभेतील १०१३ ज्येष्ठांनी निवडणूक विभागाकडे अर्ज केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक विभागाकडून विविध वयोगटातील मतदारांची संख्या जाहीर करण्यात आली आहे.
निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे. दरम्यान, वयाची ८५ शी ओलांडलेल्या ज्येष्ठ मतदारांना घरूनच मतदान करता यावी म्हणून यंदा प्रथमच भारत निवडणूक आयोगाने सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी १२ (ड) अर्ज बीएलओंकडे करण्याची मुदतही दिली होती. या मुदतीपर्यंत जिल्ह्यातील १०१३ ज्येष्ठांनी बीएलओंकडे अर्ज सादर केले.
यामध्ये अकोला लोकसभा मतदारसंघात समाविष्ठ असलेल्या रिसोड विधानसभा मतदारसंघातील ३४६ तर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात समाविष्ठ असलेल्या वाशिम विधानसभा मतदारसंघातील ३३३ व कारंजा विधानसभा मतदारसंघातील ३३४ ज्येष्ठ मतदारांचा समावेश आहे. या ज्येष्ठ नागरिकांना घरीच मतदान करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अर्ज करणारे ज्येष्ठ नागरिक
विधानसभा मतदारसंघ / संख्या
रिसोड - ३४६
वाशिम - ३३३
कारंजा - ३३४