१०, ८९७ वीजग्राहकांकडे १०.२२ कोटी थकीत, कसा चालणार महावितरणचा कारभार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 11:07 AM2021-07-28T11:07:18+5:302021-07-28T11:07:29+5:30
MSEDCL News : १० हजार ८९७ वीज ग्राहकांनी नोव्हेंबर २०२० पासून अर्थात नऊ महिन्यांपासून एकदाही वीज बिल भरले नाही.
- दादाराव गायकवाड
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ग्राहकांनी वापरलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटचे पैसे महावितरणला मिळणे अपेक्षित असताना वाशिम जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १० हजार ८९७ वीज ग्राहकांनी नोव्हेंबर २०२० पासून अर्थात नऊ महिन्यांपासून एकदाही वीज बिल भरले नाही. त्यांच्याकडे वीज बिलांपोटी १० कोटी २२ लाख रुपये थकले आहेत. वाढत्या थकबाकीमुळे महावितरणचा कारभार कसा चालणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील २३७ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केला असून, त्यांच्याकडे १.३७ कोटींची थकबाकी आहे.
कोविड-१९ चे कारण समोर करत वीज बिल भरण्याकडे काही ग्राहक मुद्दाम टाळाटाळ करीत असल्याने महावितरणला मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागत आहे. विशेष म्हणजे कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता महावितरणकडून एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत वीज ग्राहकांना वीजबिल वसुलीसाठी कोणताही तगादा न लावता अखंडित सेवा देण्यात आली. तथापि, परिस्थिती सुधारूनही थकीत वीज बिलाचा भरणा करण्याची तसदी ग्राहकांनी घेतली नाही. वाशिम जिल्ह्यात नोव्हेंबर २०२० पासून १०,८९७ वीजग्राहकांनी थकीत देयकातील कवडीचाही भरणा केलेला नाही. वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळण्यासाठी या सर्व ग्राहकांना तत्काळ वीज बिल भरणा करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. दरम्यान, या १९ हजार ८९७ ग्राहकांव्यतिरिक्त २३७ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला असून, त्यांच्याकडे १.३७ कोटी रुपयांची देयके थकीत आहेत.