१०.६२ लाख नागरिकांची तपासणी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:45 AM2021-07-14T04:45:48+5:302021-07-14T04:45:48+5:30
वाशिम : संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध व नियमित सनियंत्रण अभियान २०२१ - ‘आजादी का अमृत’ महोत्सवाचे औचित्य ...
वाशिम : संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध व नियमित सनियंत्रण अभियान २०२१ - ‘आजादी का अमृत’ महोत्सवाचे औचित्य साधून जिल्ह्यातील १०.६२ लाख नागरिकांची १ जुलै ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत तपासणी केली जाणार आहे.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना शोधून व संशयीत क्षयरुग्णांची एक्स-रे तपासणी तसेच आवश्यकतेनुसार इतर तपासण्या करून रोगाचे निदान व औषधोपचार केला जाणार आहे. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत प्राथमिक स्थितीत नवीन विनाविकृती कुष्ठरुग्ण शोधून त्याला पूर्ण कालावधीचा मोफत व औषधेापचार देणे तसेच विकृती प्रतिबंध करणे व समाजातील कुष्ठरोग व क्षयरोगाची संसर्गाची साखळी खंडित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मोफत क्षयकिरण तपासणी, एमडीआर रुग्णाची तपासणी, इतर सर्व सोई-सुविधा शासकीय व खासगी रुग्णालयात उपलब्ध आहे. १ जुलै ते ३१ ऑक्टोबर २०२१ या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आशा स्वयंसेविका, स्वयंसेवक, आरोग्यसेवक व आरोग्यसेविका यांच्या मार्फत क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णाच्या निकषाबाबत सर्व व्यक्तींची संपूर्ण तपासणी करण्यात येणार आहे.
००००
१०३९ जणांची चमू
जिल्ह्यात सर्वेक्षणासाठी आशा कार्यकर्ती, स्वयंसेवक अशा एकूण १०३९ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोहिमेदरम्यान गृहभेटीकरिता येणाऱ्या आरोग्य कर्मचारी यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस.व्ही. देशपांडे यांनी केले.
०००००००००००
मोफत थुंकी नमुना तपासणी
जिल्ह्यातील निवडक आरोग्य संस्थांमध्ये मोफत थुंकी नमुना तपासणी व प्रत्येक तालुका ठिकाणी शासकीय संस्थामध्ये क्ष-किरण तपासणी व प्रत्येक तालुका ठिकाणी निवडक खासगी संस्थांमध्ये मोफत क्ष-किरण व्यवस्था उपलब्ध आहे. सिबीनॅट मशीनद्वारे तपासणी व्यवस्था उपलब्ध आहे. क्षयरुग्णांना मोफत उपचार सर्व शासकीय संस्थांमध्ये उपलब्ध आहे.
००००००००००
तपासणी होणारे एकूण नागरिक १०६२८७१
शहरी भागातील नागरिक ७३०१७
ग्रामीण भागातील नागरिक ९८९८५४