डॉक्टरांच्या रिक्त पदामुळे १०८ रुग्णवाहिका कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 05:53 PM2019-04-17T17:53:04+5:302019-04-17T17:53:11+5:30
शेलुबाजार (वाशिम) : गोरगरीब रुग्णांसह अपघातातील गंभीर जखमींना तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून सुरू करण्यात आलेली १०८ रुग्णवाहिका डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे कुचकामी ठरत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलुबाजार (वाशिम) : गोरगरीब रुग्णांसह अपघातातील गंभीर जखमींना तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून सुरू करण्यात आलेली १०८ रुग्णवाहिका डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे कुचकामी ठरत आहे. शेलुबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत याच प्रकारामुळे अनेक अपघातग्रस्तांचा जीवही धोक्यात आल्याच्या घटना गेल्या काही दिवसांत घडल्या आहेत.
मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार हे मोठ्या लोकसंख्येचे आणि मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. नागपूर-औरंगाबाद हा द्रुतगती मार्ग याच गावातून जातो. वाहनांची मोठी वर्दळ असल्याने या मार्गावर शेलुबाजार परिसरात अपघातांच्या घटना वारंवार घडतात. या अपघातातील गंभीर जखमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार करता यावेत यासाठी शेलुबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १०८ रुग्णवाहिकाही उपलब्ध आहे; परंतु गेल्या चार महिन्यांपासून या रुग्णवाहिकेवर रात्रपाळीसाठी डॉक्टरच नाही. त्याचा फटका गंभीर आजारी गोरगरीब रुग्णांसह अपघातातील जखमींना बसून, त्यांचा जीव धोक्यात येत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांत नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावर घडलेल्या अपघातात तीन जण ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले. या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी शेलुबाजार येथील १०८ रूग्णवाहिकेची मदतही मागितली; परंतु अवघ्या चार किलोमीटर अंतरावर घटनास्थळ असतानाही डॉक्टराअभावी शेलुबाजार येथून रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. यातील एका घटने १२ एप्रिल रोजी एका गंभीर रुग्णाचा वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यूही झाला. शेलुबाजार येथे रुग्णवाहिका उभी असतानाही डॉक्टरअभावी ती उपलब्ध होऊ शकली नाही. त्याशिवाय १६ एप्रिल रोजी रात्री २ वाजताच्या सुमारास शेलुबाजारनजिक तºहाळा येथे दोन ट्रकची धडक झाली. या अपघातात एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर चालकाचे दोन पाय तुटले. यावेळीही शेलुबाजारच्या १०८ रुग्णवाहिकेची मदत मागण्यात आली; परंतु डॉक्टरअभावी ती उपलब्ध होऊ शकली नाही. त्यावेळी स्थानिकांनी खासगी वाहनांत गंभीर जखमी रुग्णाला अकोला येथे हलविले. हा प्रकार वारंवार घडत असतानाही रात्रीच्या वेळी रुग्णवाहिकेवर डॉक्टर उपलब्ध करण्यात येत नसल्याने परिसरातील ग्रामस्थांत रोषाचे वातावरण आहे. ही समस्या लक्षात शेलुबाजारच्या सरपंचांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे निवेदन सादर करीत रुग्णवाहिकेवर २४ तास डॉक्टर उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.
शेलुबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात १०८ रुग्णवाहिकेवर रात्रीच्यावेळी डॉक्टर उपलब्ध राहत नाहीत. त्यामुळे अपघातातील गंभीर जखमींचे हाल होतात आणि वेळेवर उपचार मिळत नसल्याने त्यांचा जीवही धोक्यात येत आहे. ही समस्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाने येथील रुग्णवाहिकेसाठी रात्रीच्यावेळी डॉक्टर उपलब्ध करून २४ तास सेवा द्यावी.
-अर्चना राऊत
सरपंच, शेलुबाजार