मुल्यांकनात अनुदानास पात्र माध्यमिक शाळांचे ११ प्रस्ताव प्रलंबित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 01:34 PM2020-02-11T13:34:57+5:302020-02-11T13:35:02+5:30
११ माध्यमिक शाळांच्या प्रस्तावांमधील त्रुटी दूर करण्यास विलंब झाल्याने ते विहित मुदतीत सादर झाले नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : क्षेत्रीय स्तरावर प्रलंबित असलेल्या प्रस्तावांपैकी २०१४-१५ मध्ये झालेल्या मुल्यांकनात पात्र ठरलेल्या शाळांचे प्रस्ताव १० फेब्रूवारीपर्यंत सादर करण्याचे शिक्षण संचालकांचे निर्देश होते; मात्र जिल्ह्यातील ११ माध्यमिक शाळांच्या प्रस्तावांमधील त्रुटी दूर करण्यास विलंब झाल्याने ते विहित मुदतीत सादर झाले नाहीत; तर प्राथमिक शाळांचे सर्व प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदानास पात्र घोषित करण्यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे ३ फेब्रूवारीला बैठक झाली. त्यात क्षेत्रीय स्तरावर प्रलंबित असलेल्या प्रस्तावांपैकी मुल्यांकनात पात्र ठरलेल्या शाळांचे प्रस्ताव १५ फेब्रूवारीपर्यंत शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुषंगाने शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी ६ फेब्रूवारी रोजी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे पत्र पाठवून प्रलंबित असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे प्रस्ताव १० फेब्रूवारीपर्यंत सादर करावे. त्यानंतर येणारे प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत, अशा स्पष्ट सूचना दिल्या. असे असताना १० फेब्रूवारीपर्यंत जिल्ह्यातील ११ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या प्रस्तावांमधील त्रुटी दूर झाल्या नसल्याने सदर प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती प्राप्त झाली. याप्रती शिक्षण वर्तुळातून नाराजीचा सूर उमटत आहे.
शिक्षण संचालनालयाकडून त्रुटीत काढण्यात आलेल्या प्रस्तावांची तपासणी केली जात आहे. त्रुटी दूर करून येत्या दोन दिवसांत प्रलंबित असलेले सर्व प्रस्ताव शिक्षण संचालकांकडे पाठविण्यात येतील.
- तान्हाजी नरळे
माध्यमिक शिक्षणाधिकारी
जिल्हा परिषद, वाशिम
२०१४-१५ मध्ये मुल्यांकन झालेल्या तथा अनुदानासाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांचे सुधारित प्रस्ताव प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून शिक्षण संचालकांकडे सादर करण्यात आले आहेत.
- अंबादास मानकर
प्राथमिक शिक्षणाधिकारी
जिल्हा परिषद, वाशिम