पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या ११ हजार लाभार्थींचा शोध लागेना; कृषी विभागही संभ्रमात

By सुनील काकडे | Published: January 15, 2024 06:19 PM2024-01-15T18:19:27+5:302024-01-15T18:21:26+5:30

‘सॅच्युरेशन ड्राइव्ह’ची चोख अंमलबजावणी

11 thousand beneficiaries of Pradhan Mantri Kisan Samman Nidhi not traced; Agriculture department is also confused | पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या ११ हजार लाभार्थींचा शोध लागेना; कृषी विभागही संभ्रमात

पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या ११ हजार लाभार्थींचा शोध लागेना; कृषी विभागही संभ्रमात

वाशिम : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील १ लाख ८२ हजार ८९६ लाभार्थींपैकी ११ हजार १२० लाभार्थींनी अद्यापपर्यंत ई-केवायसी आणि आधार सिडींग केलेली नाही. संपृक्तता अर्थात ‘सॅच्युरेशन ड्राइव्ह’ची चोख अंमलबजावणी होवूनही या लाभार्थींचा शोध लागणे कठीण झाले आहे. यामुळे कृषी विभागही संभ्रमात सापडला आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अर्थसहाय्यासाठी पात्र ठरलेल्या १ लाख ८२ हजार ८९६ लाभार्थींना प्रत्येकवेळी आधार सिडींग आणि ई-केवायसी करावी लागते. मात्र, १५ डिसेंबर २०२३ अखेर १७ हजार ८१ लाभार्थींकडून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कृषी विभागाकडून १५ जानेवारी २०२४ पर्यंत गावपातळीवर विशेष मोहीम राबविण्यात आली.

सन्मान निधीचा १६ वा हप्ता मिळण्यापुर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा उद्देश बाळगण्यात आला. २२ डिसेंबरपर्यंत विविध कारणांमुळे योजनेच्या १५ व्या हप्त्यापासून वंचित असलेल्या लाभार्थींचा शोध घेऊन त्यांची ई-केवायसी, आधार सिंडिग पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार, युद्धस्तरावर मोहीम राबवून ५ हजार ९६१ लाभार्थींचा शोध घेण्यात आला. मात्र, ११ हजार १२० लाभार्थींचा शोध लागणे कठीण झाले असून कृषी विभागही यामुळे संभ्रमात सापडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

९० टक्के लाभार्थी मयत झाल्याची दाट शक्यता
विविध स्वरूपातील कारणांमुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १५ व्या हप्त्यापासून १५ डिसेंबर २०२३ अखेर १७ हजार ८१ लाभार्थी वंचित होते. त्यांची शोधमोहीम कृषी विभागाने हाती घेवून ५ हजार ९६१ लाभार्थींचा शोध घेतला; मात्र उर्वरित ११ हजार १२० लाभार्थींचा शोध लागणे कठीण झाले असून त्यातील ९० टक्के लाभार्थी मयत झाल्यानेच ही स्थिती उद्भवल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

एक नजर आकडेवारी
एकूण पात्र लाभार्थी- १,८२,८९६
१५वा हप्ता मिळालेले- १,५६,९४३
१५ डिसेंबरअखेर वंचित - १७,०८१
शोध लागलेले शेतकरी - ५,९६१
शोध न लागलेले शेतकरी- ११,१२०

ई-केवायसी प्रलंबित असलेले लाभार्थी - ५७९०
आधार सिडींग बाकी असलेले लाभार्थी - ५३३०

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ‘सॅच्युरेशन ड्राइव्ह’ची चोख अंमलबजावणी केली जात आहे. आधार सिंडिग नसलेले, ई-केवायसी न केलेले, नवीन लाभार्थी शोध मोहिम आदी कामे याअंतर्गत केली जात आहेत. मात्र, ११ हजार १२० लाभार्थींचा शोध लागणे कठीण झाले आहे. त्यातील ९० टक्के लाभार्थी मयत झाल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येत आहे.
- आरिफ शाह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

Web Title: 11 thousand beneficiaries of Pradhan Mantri Kisan Samman Nidhi not traced; Agriculture department is also confused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.