वाशिम जिल्हयात ११ हजार नोंदणीकृत कामगार बांधकाम ‘किट’पासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 04:47 PM2019-08-28T16:47:51+5:302019-08-28T16:48:43+5:30
हजारो कामगारांनी वर्षभरापूर्वी नोंदणी करूनही त्यांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत पात्र बांधकाम कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपये किमतीची बांधकामासाठी उपयुक्त, आवश्यक असलेल्या अवजारांची किट वितरीत करण्यात येते किंवा तेवढे अर्थसहाय्य खात्यावर वर्ग केले जाते. वाशिम जिल्हयात मात्र कामगार कार्यालयांतर्गत हा लाभ देण्यासाठी अर्जांची छाननी प्रक्रिया अतिशय संथगतीने सुरु असून, हजारो कामगारांनी वर्षभरापूर्वी नोंदणी करूनही त्यांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने वाशिम जिल्ह्यात यासाठी १५ जून ते १४ आॅगस्टपर्यंत २१ प्रकारच्या बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी विशेष अभियानही राबविण्यात आले. या अंतर्गत हजारो कामगारांची नोंदणी करण्यात आली. आजवर वाशिम जिल्ह्यात १७ हजार १७८ कामगारांची नोंदणी करण्यात आली असली तरी, केवळ ५४९८ कामगारांना १,३६,२३, ९०० रुपयांचा विविध योजनांतर्गत लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे अद्यापही ११ हजार ६८० कामगारांना या मंडळाच्या विविध योजनांचा किंवा किटचा लाभ मिळालेला नाही. बांधकाम कामगारांना उपयुक्त, आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या १४ अवजारांची किट वितरीत करण्यात येते. या किटचे वितरण करण्याचे कंत्राट देण्यात आले असून, कामगार कार्यालयाकडून अर्जाची पडताळणी झाल्यानंतर कामगाराला कंत्राटदाराकडे पाठविण्यात येते. कंत्राटदाराकडून कामगारांचा आधार क्रमांक आणि बोटाचे ठसे घेऊन किटचे वितरण केले जाते. तथापि, यासाठी नोंदणी केलेल्या कामगारांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण करणे आवश्यक असून, ही प्रक्रिया वाशिम येथे संथगतीने सुरु आहे.
सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडून नोंदणीकृत कामगारांच्या अर्जांची पडताळणी करूनच त्यांना पात्र, अपात्र ठरविले जाते. शासकीय योजनेचा लाभ बोगस लाभार्थींना मिळू नये म्हणून अर्जांची काटेकोर छानणी केली जाते. कर्मचारी कमी असल्याने त्यास विलंब लागत आहे. पात्र लाभार्थींना लाभ दिला जाणार आहे. नोंदणीसाठी केवळ ८५ रुपये शुल्क आकारले जात आहे.
- गौरव नालिंदे
सरकारी कामगार अधिकारी