११ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; नव्याने सात अधिकारी मिळाले!
By संतोष वानखडे | Published: July 5, 2023 04:22 PM2023-07-05T16:22:25+5:302023-07-05T16:22:42+5:30
५ जुलैला बदल्यांची यादी झळकली सोशल मीडियात
संतोष वानखडे, वाशिम: अमरावती परीक्षेत्रातील जिल्ह्यांत विहित कालावधी पूर्ण झालेल्या नि:शस्त्र पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी झळकली असून, यामध्ये जिल्ह्यातील ११ अधिकाऱ्यांच्या अन्य जिल्ह्यात बदल्या तर अन्य जिल्ह्यातून सात पोलिस अधिकारी वाशिमला बदलून येणार आहेत.
अमरावती परीक्षेत्रात वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ व बुलढाणा असे पाच जिल्हे असून त्या-त्या जिल्ह्यात विहित कालावधी पूर्ण केल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीचे वेध लागले होते तर काही जण मुदतवाढ मिळविण्यासाठीदेखील प्रयत्नशील होते. अखेर ४ जुलैला बदल्यांची कार्यवाही पूर्ण झाली असून, ५ जुलैला बदल्यांची यादी सोशल मीडियात झळकली. वाशिम जिल्ह्यातून तीन पोलिस उपनिरीक्षक, सात सहायक पोलिस निरीक्षक व एक पोलिस निरीक्षकांची अन्य जिल्ह्यात बदली झाली तर तीन पोलिस उपनिरीक्षक, तीन सहायक पोलिस निरीक्षक व एक पोलिस निरीक्षक अन्य जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात बदलून येणार आहेत.
पोलिस निरीक्षक रामकृष्ण महल्ले हे अमरावती (ग्रामीण) येथून वाशिमला आले तर प्रशांत कावरे हे वाशिम येथून यवतमाळला बदलून गेले. पोलिस उपनिरीक्षक अमोल राठोड, चंदन वानखडे हे वाशिमवरून यवतमाळला गेले तर यवतमाळ येथून ज्ञानेश्वर धावळे, मारोती वंजारे आले आहेत तर अश्विनी धोडगे वाशिमवरून बुलढाणा गेल्या आहेत. अमरावती (ग्रामीण) येथून सहायक पोलिस निरीक्षक विवेक पडघान, अकोला येथून विना भगत, यवतमाळ येथून पवन राठोड हे वाशिमला आले तर महेंद्र गवई, राहुल गवई हे अमरावतीला, गजानन तडसे, राजेशकुमार गाठे हे अकोला, अतुल मोहनकार व संदीप नरसाळे हे यवतमाळ आणि आजिनाथ मोरे हे बुलढाण्याला बदलून गेले.