११ गावांना पाणीटंचाईच्या झळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:45 AM2021-05-20T04:45:02+5:302021-05-20T04:45:02+5:30
नंदलाल पवार मंगरूळपीर : मंगरूळपीर तालुक्यातील ११ गावांना सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा बसत असून, चार ठिकाणी विहीर अधिग्रहण करण्यात आले ...
नंदलाल पवार
मंगरूळपीर : मंगरूळपीर तालुक्यातील ११ गावांना सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा बसत असून, चार ठिकाणी विहीर अधिग्रहण करण्यात आले तर अद्याप टँकरसाठी एकही प्रस्ताव प्राप्त झाला नाही.
दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला मंगरूळपीर तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. गेल्या वर्षी बºयापैकी पाऊस झाल्याने तसेच त्यानंतरही परतीच्या पावसामुळे प्रकल्पात बºयापैकी जलसाठा होता. जलपातळीतही फारशी घट नाही. त्यामुळे यावर्षी पाणीटंचाईची तिव्रतादेखील कमी असल्याचे दिसून येते. गेल्यावर्षी २० पेक्षा अधिक गावांना पाणीटंचाईची झळ पोहचली होती. जवळपास १५ ठिकाणी विहीर अधिग्रहण केले होते तर चार ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. यंदा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातही तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीचा टँकरसाठीचा प्रस्ताव पंचायत समितीला प्राप्त झाला नाही. पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार तालुक्यातील शेंदूरजना मोरे, धानोरा खु, मजलापूर, गोलवाडी, लही कुंभी, कोठारी १, कोठारी २, जनुना बु, शिवणी रोड, जांब प्लॉट, आजगाव या गावांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. याशिवाय सायखेडा, निंबी येथे शेतशिवारातील विहिरीवरून पाणी आणण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा मंजूर आहे. परंतू, त्या तुलनेत प्रभावी अंमलबजावणी नसल्याचे दिसून येते. दुसरीकडे टँकर, नळ दुरूस्ती, विहिर अधिग्रहण आदीबाबत फारसे प्रस्ताव नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. आतापर्यंत केवळ चार ठिकाणचे विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यानुसार विहीर अधिग्रहणाचे आदेशही झाले आहेत.
०००
बॉक्स
चार ठिकाणी विहीर अधिग्रहण
तालुक्यातील मजलापूर, शेंदूरजना मोरे, कोठारी, गोलवाडी या गावात विहीर अधिग्रहणाचे आदेश झाले असून, त्यानुसार कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे गावकऱ्यांना तूर्तास दिलासा मिळत असल्याचे दिसून येते.
०००
गेल्यावर्षी १६ गावात विहीर अधिग्रहण
गेल्यावर्षी पाणीटंचाईची तीव्रता अधिक होती. गतवर्षी तालुक्यात १३ मे पर्यंत १६ गावांत विहीर अधिग्रहण तर ४ पेक्षा अधिक गावांत टँकर सुरू होते. त्या तुलनेत यंदा केवळ चार विहीर अधिग्रहण असल्याचे दिसून येते. विहीर अधिग्रहणाची खरोखरच आवश्यकता नाही की प्रशासकीय दिरंगाई होत आहे? याबाबत नागरिकही संभ्रमात असल्याचे दिसून येते.
०००००००००
कोट बॉक्स
मंगरुळपीर तालुक्यात गतवर्षी १५ ते १६ गावात पाणी टंचाई होती. तसेच याठिकाणी विहिरी अधिग्रहण किंवा टँकरच्या साह्याने पाणीपुरवठा सुरु होता. यावर्षी मात्र अकरा पैकी चार गावांत विहीिर अधिग्रहणाचे आदेश झाले असून सध्या तालुक्यात कोणत्याही गावात टँकर सुरु नाही. हरिणारायन परिहार
गटविकास अधिकारी, पं स मंगरुळपीर