वाशिम : ९६ अंगणवाडींसाठी १.१० कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 12:37 PM2020-03-07T12:37:40+5:302020-03-07T12:37:47+5:30
जिल्ह्यात १०७६ अंगणवाडी केंद्र असून, यामध्ये ८८ हजार ६८८ बालक पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवित आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हयातील ९६ अंगणवाडी केंद्राच्या दुरूस्तीसाठी १.१० कोटी रुपयांच्या कामांना जिल्हा परिषद प्रशासनाने ६ मार्च रोजी प्रशासकीय मंजूरी दिली आहे. सदर निधी पंचायत समितीकडे वितरीत करण्याचे आदेशही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले.
जिल्ह्यात १०७६ अंगणवाडी केंद्र असून, यामध्ये ८८ हजार ६८८ बालक पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून बालकांना शिक्षण देताना मुलभूत सुविधा उपलब्ध असणेही आवश्यक आहे. जिल्ह्यातील ९६ अंगणवाडी केंद्राच्या इमारतींची अवस्था अत्यंत खराब झाल्यामुळे सदरहू इमारतीची दुरुस्ती करणे अत्यावश्यक झाले होते. ग्राम पंचायत स्तरावरून सदर अंगणवाडी केंद्राच्या दुरूस्तीची मागणी समोर आली होती. ९६ अंगणवाडी केंद्राच्या दुरूस्तीसाठी विशेष तरतुदीद्वारे निधी उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, महिला व बालकल्याण सभापती शोभा सुरेश गावंडे यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला. याला यश आले असून, १.१० कोटींचा निधी मिळाला आहे. सदर नादुरुस्त इमारतींची दुरुस्ती करण्यासाठी मिळालेल्या १ कोटी दहा लक्ष रुपयांच्या प्रशासकीय कामांना ६ मार्च रोजी मंजुरी प्रदान केली आहे.
सदरहू निधी वितरणाचे आदेशसुध्दा मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी पंचायत समितीला वितरीत केले आहेत. सदर निधी मंजुरी व वितरणासाठी महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड यांनी प्रशासकीय कार्यवाही पूर्ण केली.
१.१० कोटींच्या निधी वितरणामुळे जिल्हयातील नादुरुस्त असलेल्या एकुण ९६ अंगणवाडी केंद्रांच्या इमारतीची दुरुस्ती होणार आहे. मुलभूत सुविधा उपलब्ध होणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार आहे.