११२ विद्यार्थ्यांना ह्रदयाचा आजार!
By Admin | Published: August 13, 2015 01:11 AM2015-08-13T01:11:55+5:302015-08-13T01:11:55+5:30
वाशिम जिल्ह्यातील ५१ विद्यार्थ्यांवर झाल्या शस्त्रक्रिया; ४२ हजार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी.
वाशिम : जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद यासह इतर ११४३ शाळांपैकी ३0२ शाळांमध्ये करण्यात आलेल्या शालेय आरोग्य तपासणीदरम्यान ११२ विद्यार्थ्यांंना ह्रदयाचा आजार असल्याची बाब निष्पन्न झाली. यापैकी ५१ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी बुधवार, १२ ऑगस्ट रोजी लोकमतला दिली. शालेय बाल आरोग्य तपासणी मोहिमेअंतर्गत एप्रिल २0१५ ते मार्च २0१६ या वर्षात जिल्ह्यातील वाशिम-२१२, रिसोड-१७६, मालेगाव-१६७, मंगरुळपीर-१६९, मानोरा-१८२; तर कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागात मोडणार्या १९४ अशा ११00 आणि नगर परिषद हद्दीत येणार्या ४३ अशा एकंदरित ११४३ शाळांमधील २ लाख २७ हजार ३३७ विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी जुलै २0१५ अखेर शहरी आणि ग्रामीण भागातील ३0२ शाळांमधील ४२ हजार १२१ विद्यार्थ्यांंची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात २७६१ मुली आणि २५२३ मुले अशा एकंदरित ५२८४ विद्यार्थ्यांंना किरकोळ स्वरुपातील आजार आढळून आला. संबंधित विद्यार्थ्यांंना शालेय बाल आरोग्य तपासणी मोहिमेअंतर्गत औषधोपचाराची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या तीन महिण्यांत ३0२ शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या शालेय बाल आरोग्य तपासणी मोहिमेदरम्यान ११२ विद्यार्थ्यांंना विविध स्वरुपातील ह्रदयाचा आजार जडल्याची बाब निष्पन्न झाली आहे. त्यापैकी ५१ विद्यार्थ्यांंवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्यांच्या आरोग्यावर ओढविलेला धोका टाळणे शक्य झाले आहे. यासह ६ ते १८ वयोगटातील चार ह्रदयाचा आजार जडलेल्या विद्यार्थ्यांंवर जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून यासाठी जिल्ह्यातील शालेय बाल आरोग्य तपासणी पथक प्रयत्नशिल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.