‘फिट इंडिया’त वाशिम जिल्ह्यातील ११४० शाळा ‘अनफिट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 11:36 AM2020-12-22T11:36:31+5:302020-12-22T11:36:41+5:30
Fit India आतापर्यंत २८३ शाळांची नोंदणी झाली असून, ११४० शाळांची नोंदणी होणे बाकी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : फिट इंडिया मोहिमेंतर्गत वाशिमसह राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. आतापर्यंत २८३ शाळांची नोंदणी झाली असून, ११४० शाळांची नोंदणी होणे बाकी आहे.
मुलांना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी केंद्र शासनाने फिट इंडिया ही मोहीम हाती घेतली आहे. शारीरिक सृदृढतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून त्याबद्दल जागृती निर्माण करणे, शारीरिक क्षमता मूल्यमापन चाचण्या या शाळास्तरावर घेऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापनविषयक माहिती संकेतस्थळावर किंवा मोबाइल अॅपद्वारे भरण्यात यावी आदी उद्देश यशस्वी व्हावे याकरिता फिट इंडिया मोहिमेंतर्गत सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांची नोंदणी शासनाच्या संकेतस्थळावर करण्यात येत आहे. तसेच खेलो इंडियाच्या अॅपवर पहिली ते बारावीच्या सर्व शाळांमधील शारीरिक शिक्षण विषयाच्या एका शिक्षकाला नोंदणी करणे आवश्यक आहे.
शाळेत शारीरिक शिक्षण या विषयाचे शिक्षक उपलब्ध नसल्यास संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांनी या कामासाठी एका सहायक शिक्षकाची नियुक्ती करावी, अशा सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्राचे संचालक राहुल द्विवेदी यांनी दिलेल्या आहेत. जिल्ह्यात शारीरिक शिक्षकाची अद्याप नोंदणी झाली नसून २८ डिसेंबर २०२० ही अंतिम मुदत आहे तर दुसरीकडे शाळांची नोंदणी करण्यासाठी २७ डिसेंबर अशी अंतिम मुदत आहे. आतापर्यंत १४२३ पैकी २८३ शाळांची नोंदणी झाली असून, ११४० शाळांची नोंदणी बाकी आहे.
फिट इंडिया मोहिमेंतर्गत शाळा व शारीरिक शिक्षकांनी नोंदणी करण्यासंदर्भात जिल्ह्यात कार्यवाही सुरू आहे. तांत्रिक अडचणी येत असल्याचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी सांगितले. शारीरिक शिक्षकांची नोंदणी अधिक व्हावी याकरिता प्रशिक्षकांची मदतही घेतली जात आहे.
- चंद्रकांत उपलवार,
जिल्हा क्रीडा अधिकारी
फिट इंडिया मोहिमेंतर्गत वाशिम जिल्ह्यातील शाळांची नोंदणी केली जात आहे. याबाबत सर्व मुख्याध्यापक, प्राचार्यांना सूचना दिलेल्या आहेत. नाेंदणी करण्यासंदर्भात लिंकही संबंधित शिक्षक व मुख्याध्यापकांना पाठविण्यात आली आहे. नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे.
-अंबादास मानकर
शिक्षणाधिकारी वाशिम