वाशिम जिल्ह्यात ११४८५ कुपोषित बालके; कुपोषणमुक्तीसाठी त्रिसुत्री कार्यक्रम
By संतोष वानखडे | Published: February 25, 2024 04:14 PM2024-02-25T16:14:24+5:302024-02-25T16:15:05+5:30
कुपोषणाच्या श्रेणीतून बालकांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून यापूर्वी अनेकवेळा ठोस प्रयत्न झाले.
वाशिम : जिल्ह्यात सर्व श्रेणी मिळून ११ हजार ४८५ बालके कुपोषित असल्याची नोंद असून, या बालकांना कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर काढण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने त्रिसुत्री कार्यक्रमाची आखणी केली. स्वातंत्र्यदिनापूर्वी जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने सोडला असून, त्याअनुषंगाने कुपोषणमुक्ती कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.
कुपोषणामागे विविध कारणे कारणीभूत आहेत. कुपोषणाच्या श्रेणीतून बालकांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून यापूर्वी अनेकवेळा ठोस प्रयत्न झाले. अधिकाऱ्यांनी कुपोषणग्रस्त बालके दत्तकही घेतली होती. परंतू, कुपोषणमुक्तीच्या या लढ्याला अपेक्षित यश आले नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यात शून्य ते पाच वयोगटातील २८५ बालके ही कुपोषणाच्या अतितीव्र (सॅम) तर १०६७ बालके ही तीव्र (मॅम) श्रेणीत आहेत. तसेच (एसएडब्ल्यू) बालके २१२० आणि (एमयूडब्ल्यू) बालके ९३६५ असे जिल्ह्यातील एकुण ११४८५ बालके कुपोषित आहेत. या कुपोषित बालकांना पुढील सहा महिन्यांमध्ये कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर काढुन येणाऱ्या १५ ऑगस्ट रोजी जिल्हा उपोषण मुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग तसेच आरोग्य विभागाच्या समन्वयातून कृती आराखड्याची आखणी केली.