२.०३ लाख बाधितांना मिळणार वाढीव दराने ११५.२६ कोटी
By दिनेश पठाडे | Published: January 16, 2024 06:05 PM2024-01-16T18:05:22+5:302024-01-16T18:06:08+5:30
अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी राज्य आपती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला.
वाशिम: शासनाने नैसर्गिक आपत्तीने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीत मोठी वाढ केली आहे. जिल्ह्यातील २ लाख ३ हजार ८५७ शेतकऱ्यांना ११५ कोटी २६ लाख ६२ हजार ४१३ कोटींची मदत मिळणार आहे. जिल्ह्यात २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२३ दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दराने मिळणाऱ्या मदतीचा लाभ होणार आहे.
नोव्हेंबर, २०२३ मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी राज्य आपती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दोन हेक्टर ऐवजी मर्यादा तीन हेक्टर मर्यादेत मदत मिळणार आहे. त्यात जिरायत पिकांच्या नुकसानासाठी १३,६००, बागायती पिकांच्या नुकसानासाठी २७,०० आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३६,००० प्रतिहेक्टर या दराने भरपाई मिळेल. नोव्हेंबर २०२३ मधील पीक नुकसानापोटी बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पूर्वीच्या प्रचलित दरानुसार ७६ कोटी ३७ लाख ९८ हजार ४५८ रुपयांच्या निधीची मागणी केली होती. त्यामध्ये जिरायत पिकांच्या नुकसानासाठी पूर्वीच्या प्रचलित दरानुसार ३३ कोटी २१ लाख ९४ हजार ८४८ रुपये, तर बागायती पिकांच्या नुकसानासाठी ४३ कोटी १६ लाख ३ हजार ६१० रुपये निधीचा समावेश होता. आता बागायती पीक नुकसानभरपाई म्हणून ५४ हजार ५९२ शेतकऱ्यांना ६७ कोटी १० लाख ४८ हजार ५५० तर जिरायती पीक नुकसानभरपाईसाठी १ लाख ४९ हजार २६५ शेतकऱ्यांना ४८ कोटी १६ लाख १३ हजार ८६३ रुपयांची मदत मिळणार आहे.