लोकन्यायालयात ११८९ प्रकरणे निकाली, ४.६१ कोटींची तडजोड; दोन प्रकरणात पती-पत्नी संसार पुन्हा जुळला
By दिनेश पठाडे | Published: December 9, 2023 08:11 PM2023-12-09T20:11:28+5:302023-12-09T20:11:55+5:30
एकाच दिवशी ११८९ प्रकरणांचा निपटारा झाला असून ४ कोटी ६१ लाख १० हजार ९१८ रुपयांची तडजोड झाली आहे.
वाशिम : जिल्हा व तालुका न्यायालयात ९ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये एकाच दिवशी ११८९ प्रकरणांचा निपटारा झाला असून ४ कोटी ६१ लाख १० हजार ९१८ रुपयांची तडजोड झाली आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी दिलेलया निर्देशानुसार शनिवारी जिल्ह्यातील सर्व तालुका तसेच जिल्हा न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील न्यायालयात प्रलंबित असलेल्या कएूण १००६ प्रकरणांचा तसेच दाखलपूर्व १८३ प्रकरणे असे एकूण ११८९ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. तर साडेचार कोटींवर रकमेचे प्रकरणे निकाली निघाली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विधी व सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष आर.पी.पांडे, दिवाणी न्यायाधीश तथा प्राधिकरणाचे सचिव व्ही.ए.टेकवाणी यांनी विविध पॅनलला भेट देऊन माहिती घेतली. राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा, तालुका वकील संघ, जिल्हा पोलिस दल, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
विभक्त राहत असलेले पती-पत्नी पुन्हा एकत्र
पती-पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला की ते नाते तुटण्याच्या दिशेने जाते. आणि न्यायालयात जाऊन नाते संपुष्टात आणले जाते. मात्र लग्नाची ही नाती संपुष्टात येऊ न येत म्हणून न्यायालयही शेवटच्या क्षणापर्यंत आटोकाट प्रयत्न करीत असते. शनिवारी झालेल्या लोकन्यायालयात विभक्त राहत असलेल्या दोन वैवाहिक वादाच्या प्रकरणांमध्ये निलेश व वनिता आणि सुनिल व अनुसया ह्या पती-पत्नी यांच्या मध्ये प्रेमाचा समेट घडवून आणल्यामुळे त्यांनी एकत्र नांदण्याचा निर्णय घेतला. जिल्हा न्यायाधीश पी.आर. पांडे यांच्याहस्ते पती-पत्नीचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.