शहरातील ११९ रुग्णालयांकडे अग्निशमनची एनओसीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:44 AM2021-01-13T05:44:18+5:302021-01-13T05:44:18+5:30
वाशिम शहरामध्ये एकूण १२४ नाेंदणीकृत रुग्णालये आहेत. यापैकी केवळ ५७ रुग्णालयांची फायर ब्रिगेड नाेंदणी करण्यात आली आहे. परंतु यातील ...
वाशिम शहरामध्ये एकूण १२४ नाेंदणीकृत रुग्णालये आहेत. यापैकी केवळ ५७ रुग्णालयांची फायर ब्रिगेड नाेंदणी करण्यात आली आहे. परंतु यातील केवळ पाच रुग्णालयांनी अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणापत्र घेतलेले आहे. वाशिम शहरातील असलेल्या बहुतांश रुग्णालयांतील फायर ऑडिट करण्यात आले असले तरी अग्निशनम विभागाचे प्रमाणपत्र मात्र माेजक्याच हाॅस्पिटलकडे असल्याचे अग्निशमन विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे. फायर ऑडिट केल्यानंतर अग्निमशन विभागाकडे नाहरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करून ते घ्यावे लागते. मात्र, अनेकांनी हे प्रमाणपत्र घेतले नसल्याचे अग्निशमन विभागातील नाेंदीवरून दिसून येते. शहरातील काही नामांकित व माेठ्या अशा केवळ ५ हाॅस्पिटलकडेच नाहरकत प्रमाणपत्र उपलब्ध असल्याची माहिती आहे.
...............
७३ हाॅस्पिटलला भेटी
भंडारा येथील घटनेनंतर वाशिम शहरातील अग्निशमन विभागातर्फे ७३ हाॅस्पिटलला भेटी देऊन १० जानेवारी राेजी पाहणी करण्यात आली. ज्यांच्याकडे एनओसी नाही, अशा हाॅस्पिटलला नाेटीस देण्यात आली आहे. शहरातील ६७ हाॅस्पिटलने फायर ऑडिट केले; परंतु त्यांच्याकडे नाहरकत प्रमाणपत्र आढळून आले नाही. शहरातील केवळ ४ ते ५ जणांकडेच नाहरकत प्रमाणपत्र आहे.
............
सरकारी रुग्णालयांकडेही आवश्यक एनओसी नाही
फायर ऑडिट झाल्यानंतर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाकडे नाहरकत प्रमाणपत्राकरिता अर्ज करावा लागताे. त्यानंतर आवश्यक असलेली रुग्णालयाची पडताळणी केल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते. परंतु शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे सुद्धा नाहरकत प्रमाणपत्र नसल्याचे नगरपरिषद अग्निशमन विभागाने सांगितले.
............
शहरातील काही माेजक्या ४ ते ५ हाॅस्पिटलकडेच अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र आहे. १० जानेवारी राेजी शहरातील ७३ हाॅस्पिटलला भेट देऊन सर्वांना याबाबत नाेटीस बजावण्यात आली आहे. यामधील अनेक हाॅस्पिटलचे फायर ऑडिट झाल्याचे दिसून आले.
- अनुजकुमार बासम, अग्निशमन विभागप्रमुख, वाशिम